Bookstruck

जमीनदार व त्याचे दोन मुलगे 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मनूच्या झोपडीपासून थोड्याशा अंतरावर सखाराम राहात असे. सखाराम मोलमजुरी करी. त्याच्या बायकोचे नाव साळूबाई. साळूबाई मोठी प्रेमळ होती. दुसर्‍याची मन:स्थिती तिला पटकन समजे. तिला एक मुलगा होता. असेल पाच-सहा वर्षांचा, मोठा गोड मुलगा. तो आई-बापांचा फार आवडता होता. त्याचे नाव रामू. साळूबाई रामूला बरोबर घेऊन मनूकडे आली. गर्दी आता ओसरली होती. लोक आपापल्या उद्योगाला निघून गेले होते. मनू तेथे एका जुन्या आरामखुर्चीत विषण्णपणे पडला होता.

“वाईट झालं हो. कसे नेववले पैसे तरी. वाईट नका वाटून घेऊ. वाईट वाटून काय करायचं मनूदादा? आणि तुम्ही भारीच पैशाच्या मागं लागता. कधी देवळात जात नाही. देवदर्शन करीत नाही. एकादशी नाही. सोमवार नाही. रोज उठून मेलं ते अक्षै काम! काम! मनूदादा काम करावं परंतु रामाला विसरू नये. देवाला विसरू नये. आता देवाला विसरू नका, कधी भजनात जात जा. तुम्हांला येत का भजन? या आमच्या रामूला येतात अभंग. रामू, दाखव रे म्हणून अभंग. हसतोस काय लबाडा! म्हण की. मनूबाबांना म्हणून दाखव.” साळूबाई बोलत होती.

रामू लाजला. त्याने आपले डोळे दोन्ही हातांनी मिटले. पुन्हा ते हळूच उघडून त्याने बघितले. नंतर आईच्या पाठीमागे जाऊन लपला.

“म्हण ना रे. लाजायला काय झालं?” आई म्हणाली.

रामू अभंग म्हणू लागला.

आता तरी पुढे हाचि उपदेश, नका करू नाश आयुष्याचा
सकलांच्या पायां माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा ।
हित ते करावे देवाचे चिंतन, करूनिया मन शुद्ध भावें
तुका म्हणे हित होय, तो व्यापार, करा, काय फार शिकवावे।।


त्या लहान मुलाची वाणी निर्मळ होती. ती वाणी गोड वाटत होती. अभंग म्हणून झाल्यावर रामूने आईच्या गळ्याला एकदम मिठी मारली. तिने त्याचा प्रेमाने मुका घेतला.

“मीही माझ्या सोन्याच्या त्या मोहरांचे असेच मुके घेत असे. त्या मोहरा म्हणजे जणू माझी मुलं. त्यांचे मी मुके घेत असे. त्यांना मी पोटाशी धरीत असे. आता कोणाला धरू पोटाशी, कोणाचे घेऊ मुके?” मनूबाबा म्हणाला.

“या माझ्या रामूचे घ्या.” साळूबाई म्हणाली.

« PreviousChapter ListNext »