Bookstruck

जमीनदार व त्याचे दोन मुलगे 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“रामूचे?” मनूबाबाने आश्चर्याने विचारले.

“हो. रामू म्हणजे आमचं सोनं. आम्ही मोलमजुरी करतो. परंतु कोणासाठी? या रामूसाठी. आमचे पैसे या रामूसाठी. रामू आमची धनदौलत. चालती बोलती धनदौलत. हसणारी, खेळणारी धनदौलत.” असे म्हमून साळूबाईने रामूला पोटाशी धरले. थोडा वेळ कोणी काही बोलले नाही.

“आज मनूबाबा, तुम्ही किनई, आमच्याकडेच जेवायला या. घरी करू नका. आणि आता हे थालीपीठ आणलं आहे ते खा. आज सकाळी कामाला जाताना म्हणाले, ‘थालीपीठ कर.’ केलं. पुरुषांच्या पोटाला निरनिराळे पदार्थ हवे असतात. आम्हा बायकांना काहीही चालत. घ्या हे थालीपीठ. नाही म्हणू नका. तुम्ही बरेच दिवसांत खाल्लं नसेल.” साळूबाई म्हणाली.

तिने म्हातार्‍याच्या हातांत थालीपीठ दिले. पानात गुंडाळलेले होते ते. मनूबाबा त्याच्याकडे पाहात राहिला. त्याने एक तुकडा रामूला दिला.

“त्याला कशाला? ते सारं खाईल. लबाड आहे तो. तुम्हीच खा. मी आता जात्ये. आणि तुम्ही किनई, मनूबाबा, फार नका काम करीत जाऊ. जरा हसत बोलत जा. देवदर्शनाला जात जा. भजन करा. समजलं ना?” असं म्हणून साळूबाई रामूला घेऊन निघाली.

मनूबाबा खुर्चीतच होता. गावातील किती तरी मंडळी येऊन गेली. परंतु साळूबाईचे बोलणे किती साधे, किती प्रेमळ! त्याच्या मनावर त्याचा परिणाम झाला. त्याच्या त्या खोल गेलेल्या डोळ्यांतून पाणी येणार होते. परंतु मोठ्या कष्टाने ते त्याने आवरले. गेल्या पंधरा वर्षांत त्याच्या हृदयाला भावनांचा स्पर्श झाला नव्हता. परंतु आज त्याला स्वत:ला हृदय असल्याची जाणीव झाली. त्यालाही गोड गोड अभंग आठवू लागले. आपण एके काळी देवळात जात असू, देवासमोर बसत असू. ते त्याला आठवले. हृदयाचे बंद दार जरासे किलकिले झाले. ते दोर गंजून गेले होते, परंतु साळूबाईच्या शब्दांतील स्नेहाने गंज निघून गेला. दार जरा उघडले. थोडासा प्रकाश हृदयात शिरला.

« PreviousChapter ListNext »