Bookstruck

सोनी 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“आता का मी लहान आहे? भातुकली खेळत असे तेव्हा रागावत असे. तेव्हा मी लहान होते.”

“आता तू मोठी झालीस.”

“आणि तू सुद्धा मोठा झालास.”

“म्हणूनच तुला मी काही तरी विचारणार आहे.”

“जे विचारणार आहे ते का मोठं झाल्यावर विचारायचं असतं?”

“हो.”

“मग विचार.”

“तू माझ्याशी लग्न लावशील? आपण पतीपत्नी होऊ. दोघं संसार करू.”

“परंतु मग माझ्या बाबांना कोण? ते म्हातारे झाले आहेत. त्यांना मी कसं सोडू? त्यांनी मला लहानाचं मोठं केलं. ते का म्हातारपणी एकटे राहाणार? हल्ली त्यांच्यानं काम होत नाही. त्यांना सोडून जाणं म्हणजे कृतघ्नपणा आहे.”

“परंतु त्यांना नको सोडून द्यायला. आपण सारी एकत्र राहू. मनूबाबांना विश्रांती देऊ.”

“असं चालेल का?”

“न चालायला काय झालं? परंतु मी तुला आवडत असेन तर.”

“तू नाही आवडत तर कोण? तुझ्याशिवाय मला करमत नाही. चांगला आहेस. खरंच मला तू आवडतोस.”

“आणि मला तू आवडतेस.”

“मी बाबांना विचारीन. ते काय म्हणतात पाहू.”

“विचार. त्यांचा आनंद तोच आपला.”

रामू व सोनी निघून गेली. रामू कामाला गेला. सोनी घरी आली. त्या दिवशी सायंकाळी मनूबाबा सोनीचा हात धरून फिरायला गेले होते. सूर्य अस्ताला जात होता. पश्चिमेकडे किती सुंदर रंग पसरले होते आणि सोनीच्या तोंडावरही शतरंग नाचत होते.


« PreviousChapter ListNext »