Bookstruck

सोनीचे लग्न 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“खरोखर. सोनीच्या आईची शपथ. लग्नासारख्या पवित्र व मंगल गोष्टी. त्यांची का मी थट्टा करीन? मग ठरलं ना?”

“तुमची इच्छा असंल तर ठरलं. माझी ना नाही. माझ्या रामूचं भाग्य. माझीही पूर्वपुण्याई म्हणून अशी सून मला मिळत आहे.”

“मग साखर घ्या व गोड तोंड करून जा.”

“कुठं आहे साखर?”

“कशाला साखर?” सोनीने एकदम येऊन विचारले.

“तू आलीस वाटतं? रामूच्या आईचं तोंड गोड कर.” मनूबाबा म्हणाले.

“कडू कशानं झालं? ही घ्या साखर.” सोनीने साखर दिली.

“तू पण खा. मनूबाबांना दे.”

“ही कशाची साखर?”

“ते तुला मागून कळेल. आता मी जात्ये.”

साळूबाई निघून गेल्या. मनूबाबांनी सोनीला सारी हकिगत सांगितली. सोनी आनंदली, नाचली. तिचे तोंड फुलले. तिचे डोळे किती सुंदर दिसत होते!

तिन्हीसांजा झाल्या. रामू कामावरून आज घरी आला नाही. सोनी त्याच्याकडे गेली होती. परंतु रामू न दिसल्यामुळे ती हिरमुसली झाली. कोठे गेला रामू? बागेत तर नसेल गेला? परंतु घरी येऊन मग जातो. मलाही हाक मारून जातो. परंतु आज का एकटाच गेला? एकटाच फुले फुलविण्यासाठी गेला? सोनीही निघाली. ती बागेत आली. रामू पाणी घालीत होता. सोनी त्याला मदत करू लागली. पाणी घालून झाले. सोनीने काही फुले वेचून घेतली.

“चल रामू, आईच्या जागी जाऊ.”

“चल.”

« PreviousChapter ListNext »