Bookstruck

जन्मभूमीचे दर्शन 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

“बाबाच ते.”

“चालत येत आहेत.”

हो. ते मनूबाबाच होते. पाठीवर लहानसे गाठोडे होते. हातात काठी होती. ते वाकले होते. हळूहळू येत होते. सोनी धावतच गेली व तिने ते गाठोडे घेतले.

“बाबा, चालत कशाला आलेत?”

“गाडीनेच आलो. परंतु गाव दिसू लागल्यावर उतरलो. गाडीवानाला दुसरीकडे जायचे होते. कशाला त्याला हिसका? आता सायंकाळ होत आली. मला आता एकट्यानेच जायचे आहे. माझ्या पापपुण्याची काठी हातात घेऊन देवाकडे जायचे आहे. खरे ना?”

“बाबा, तुमच्या जन्मभूमीहून आम्हांला काय आणलंत?”

“कर्तव्य नि प्रेम. ह्या दोन वस्तू मी तुम्हांला देतो. ह्या माझ्या शेवटच्या देणग्या. रामू, सोन्ये, सुखाने संसार करा. जपून वागा. संसार करा. जपून वागा. संसार म्हणजे सर्कशीचा खेळ. तारेवरून चालणं. तोल सांभाळावा लागतो. संयमाची छत्री हातात धरून चाला, म्हणजे तारेवरून पडणार नाहीत. परस्परांस सांभाळा. शेजार्‍यापाजार्‍यांना मदत करा. परावलंबी होऊ नका. चैन करू नका. कंजूषपणाही नको. सारं प्रमाणात असावं. प्रमाणांत सौंदर्य आहे. समजलं ना?”


“बाबा, तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही वागू. तुमचा आशीर्वाद आम्हांला सांभाळील.”

“परंतु तुम्ही आम्हांला अजून पुष्कळ दिवस हवेत.” सोनी म्हणाली.

“ते का आपल्या हाती? ते बघ दूर दिवे चमकताहेत.” मनूबाबा म्हणाले.

« PreviousChapter List