Bookstruck

जन्मभूमीचे दर्शन 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“बाबा, कशी आहे तुमची जन्मभूमी?”

“सुंदर आहे. सायगाव माझ्या जन्मभूमीचं नाव. गावाभोवती सदैव वाहाणारी बहुळा नदी आहे. किती निर्मळ व गोड तिचं पाणी. आमच्या गावात भांडणतंटा होत नसे. द्वेषमत्सर नसत. कोर्टकचेरीत कधी कोणी गेलं नाही. ‘हा अपराध करणारा, हा पाप करणारा,’ एवढंच देवळात जमून सर्व जण मिळून पुरावा पाहून ठरवीत. दुसरी शिक्षा नसे. ‘पाप करणा-याचं मन त्याला खातच असतं. निराळी शिक्षा कशाला?’ असं माझा गावा म्हणे. पाहून येईन तो गाव पुन्हा. किती विस्तृत मैदानं, कशी आंबराई, कशी स्वच्छ सुंदर घरं! येऊ का जाऊन? देवाकडे जाण्यापूर्वी एकदा पाहून येईन, मातृभूमी पाहून येईन.”

“तुम्ही का एकटेच जाणार?”

“एकट्याला जाऊ दे. माझ्या भावना, माझ्या स्मृती, तुम्हांला त्यात मजा वाटणार नाही. खरं ना?”

“मग या जाऊन. परंतु पायी जाऊ नका. तुम्हा आता वृद्ध झाला आहात. गाडी घोडा करून जा. तुम्ही आम्हांला पुष्कळ दिवस हवेत.”

मनूबाबा पुन्हा आपल्या सायगावात आले. परंतु सायगाव पूर्वीचा राहिला नव्हता. कोठे आहे ती आंबराई? कोठे आहेत ती विस्तृत मैदाने? आता जिकडे तिकडे धुराच्या चिमण्या दिसत होत्या. सायगाव उद्योगधंद्याने गजबजलेले होते. सारी गडबड. त्या विस्तृत मैदानात मोठमोठे कारखाने उघडण्यात आले होते. आंबराई जाऊन तेथे नवीन घरे बांधण्यात आली होती. ठिकठिकाणी वकिलांच्या पाट्या होत्या. कोर्टकचेरी गावात आली होती. मनूबाबांना स्वत:चे घरही कोठे दिसले नाही. त्यांचा मित्र विनू तोही दिसला नाही. मनूबाबा सर्वत्र पाहात राहिले, त्यांना ओळखीचे कोणी भेटेना आणि त्यांनाही कोणी ओळखीना. सार्‍या सायगावात ते भटकले. शेवटी ते बहुळा नदीच्या तीरावर आले. परंतु बहुळेच्या पाण्यात आता गावातील गटारे सोडण्यात आली होती! ती लोकमाता लेकरांची सारी घाण धुऊन नेत होती. मनूबाबास वाईट वाटले. ते हिंडत हिंडत वरच्या बाजूस गेले. जेथे पाणी निर्मळ होते तेथे गेले. तेथे ते बसले. बहुळेचे निर्मळ मधुर असे पाणी ते ओंजळीने प्यायले. त्या बहुळेचेच पाणी पिऊन ३५ वर्षांपूर्वी ते मध्यरात्री निघून गेले होते. पुन्हा तिचे पाणी पिऊन ते उठले. त्यांनी बहुळेला प्रणाम केला. पुन्हा मनूबाबा उठले. आता सायंकाळ होत आली होती.  अंधार पडू लागला होता. मनूबाबा गावात आले. गावात जिकडे तिकडे विजेच्या दिव्यांचा लखलखाट होता. म्हातार्‍या मनूबाबांचे डोळे दिपून गेले. सायगावला प्रणाम करून ते परत फिरले. त्या दिवशी सायंकाळी रामू व सोनी फिरायला गेली होती. तो तिकडून कोणी तरी येत आहे असे त्यांना दिसले. दोघेजण धावत गेली.


« PreviousChapter ListNext »