Bookstruck

जन्मभूमीचे दर्शन 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सोनी व रामू यांचा नवा संसार सुरू झाला. मनूबाबा आता काम करीत नसत. मागाचे खटक खटक आता बंद झाले. त्यांच्या जीवनाचे वस्त्रही आता बहुतेक पुरे होत आले होते.

एके दिवशी सायंकाळी सोनी व मनूबाबा फिरायला गेली होती. मनूबाबा एका शिलाखंडावर बसले होते. त्यांच्या पायांशी सोनी होती.

“बाबा, सूर्य मावळला. आता लवकर अंधार पडेल.”

“माझाही जीवनसूर्य आता लवकरच मावळेल.”

“का असं म्हणता बाबा? आम्हांला कंटाळलेत?”

“नाही बेटा. परंतु एक दिवस बोलावणं येईलच. माझ्या झोपडीतील माग बंद झाला. जीवनाचाही माग आता बंद होईल. तुम्ही सुखानं नांदा. सोन्ये, अलीकडे माझ्या मनात एक तीव्र इच्छा उत्पन्न झाली आहे.”

“कोणती बाबा? आम्ही ती पुरी करू.”

“इच्छा एवढीच की, जन्मभूमी पुन्हा एकदा पाहून यावं. सोन्ये, तीस-पस्तीस वर्षं झाली. माझी जन्मभूमी सोडून मी या रायगावी आलो. मी आलो त्या वेळेस जीवनात अंधार होता. जगात न्याय नाही, सत्य नाही, प्रेम नाही, स्नेह नाही, देव नाही, धर्म नाही असं मला वाटू लागलं होतं. मी माझी जन्मभूमी सोडली. तिचा विचारही कित्येक वर्ष माझ्या मनात आला नाही. परंतु तू सारं मला पुरतं दिलंस, तू माझ्या जीवनात पुन्हा प्रकाश आणलास, श्रद्धा आणलीस. माझ्या जन्मभूमीचा निराशेच्या भरात मी त्याग केला. आज जीवनात आशा आहे. तर ती जन्मभूमी मला पुन्हा पाहून येऊ दे. येऊ का जाऊन?”


« PreviousChapter ListNext »