Bookstruck

घरी परत 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'प्रणाम.' विजय म्हणाला.

कितीदा तरी मुक्ताने मागे वळून पाहिले. विजय तेथेच उभा होता. ती दिसेनाशी झाल्यावर विजय निघाला. घरी आई वाट पाहात असेल, मंजुळाताई वाट बघत असेल, असे आता त्याच्या मनात आले. तो झपझप चालू लागला. त्याच्या डोक्यात विचारांचे वारे जोराने वाहात होते. त्याच्या हृदयात भावनांचा प्रवाह घो घो करून वाहात होता आणि त्याचे पायही वायुवेगाने चालत होते.

आता सायंकाळ झाली  होती. गावात दिवे लागले होते. गाईगुरे घरी परत येत होती अशा वेळेस दमलेला विजय घरी आला. मंजुळाताई वाटच पाहात होती.

'आई, आला ग, विजय आला.'  मंजुळा म्हणाली.

आई बाहेर आली. इतक्यात बलदेवही बाहेरून आले. सुमुखही आला. विजयने सर्व हकिगत सांगितली.

'राजा बोलला तुझ्याजवळ?' आईने आश्चर्याने विचारले.

'होय. त्याच्या मुलीने गाणे ऐकायला बसविले. ही पाहा मला मिळालेली पदके. हे शंभर रुपये. सुमुख, हे एक पदक तुला घे.' विजय म्हणाला.

'चुलीत घाल ते.' सुमुख म्हणाला.
'सुमुख, असे रे काय बोलतोस?' मंजुळा म्हणाली.

'ताई, हे घे तुला २५ रुपये. हे २५ आईला. २५ बाबांना. हे २५ सुमुखला.' विजय वाटणी करीत म्हणाला.

'विजय, तुला नकोत का? रंग, कुंचले, पुठ्ठे यांसाठी नकोत का? ठेव, तुझ्यासाठी ठेव. विजय, तू मोठा होशील.' मंजुळा म्हणाली.

'आई, मी माईजींकडे जाऊन येतो.'

असे म्हणून विजय माईजींकडे गेला. त्यांच्या पाया पडला. त्यांनी  आशीर्वाद दिला. विजयचे यश ऐकून त्यांना आनंद झाला.


« PreviousChapter ListNext »