Bookstruck

परिभ्रमण 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'अरे ते पाहा. पकडा. हेच ते दोघे चोर. पकडा.' असा आवाज आला. विजय व विहारी पळू लागले, तो ते शिपाईही येत होते. पळता पळता समोर प्रचंड नदी आली. आता? ते शिपाई जवळ आले. त्या दोघांनी त्या पात्रात उडया घेतल्या. ते शिपाई आता मात्र माघारे गेले. प्रवाहात ते दोघे सापडले. विजय उत्कृष्ट पोहणारा होता; परंतु विहारी दमला की काय? विजय त्याच्या मदतीस धावला. त्याने विहारीला तीराला आणले. दोघे पैलतीरी आले. आता निराळे राज्य. निराळा देश. शिपायांचे भय नव्हते आता.

'विहारी, सुटलो एकदाचे.'

'परंतु विजय, आपण कोठे आलो माहीत आहे?'

'कोठे?'
'माझ्या राजाचा हा प्रदेश. मी पुन्हा माझ्या राजाच्या हद्दीत आलो. ही नदी हद्द आहे. ते शिपाई पाठीस लागले म्हणून यावे लागले. चल, आता माझा देश तुला दाखवतो. माझ्या गावी तुला नेतो. सस्यश्यामल सुंदर प्रदेश.'

खरोखरच तो रमणीय प्रदेश होता. हिरवीगार झाडे दिसत होती. जमीन कशी काळसर परंतु जरा भुरकी अशी होती. पेरूच्या बागा होत्या. अंजिरांच्याही होत्या. हिरवे पोपट अंजिरांच्या व पेरूंच्या बागांतून उडत होते. एके ठिकाणी बागवानाने त्यांना भरपूर फळे दिली. त्याचा मोबादला म्हणून विहारीने एक विनोदी गोष्ट सांगितली.

'बुध्दभिक्षू फार छान गोष्टी सांगतात.' बागवान म्हणाला.

'मी भिक्षू व्हावे असे माझ्या बाबांना वाटे.' विजय म्हणाला.

'तुमच्यासारख्या राजबिंडया तरुणाने का भिक्षू व्हावे? राजाच्या मुलीला तुम्ही नवरा शोभाल.' बागवान म्हणाला.

'खरे आहे, खरे आहे.' विहारी हसून म्हणाला.   

ते दोघे पुन्हा निघाले. एका मैदानात आले. तो तिकडून घोडेस्वारांची एक तुकडी येत होती.

'राजा, आमच्या देशाचा राजा.' विहारी म्हणाला.

« PreviousChapter ListNext »