Bookstruck

परिभ्रमण 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'कोठे चालले हे सैन्य? विजयने विचारले.

'कोठे तरी लढाईला.' विहारी म्हणाला.

त्या घोडेस्वारांतील एकाने विहारीला पाहिले.

'पळालेला विहारी तो बघा.' त्याने सेनानायकाला सांगितले.

राजाच्या कानांवर गेली ती वार्ता.

'जा, त्याच्या मुसक्या बांधून आणा.' हुकूम झाला.

घोडेस्वार दौडत आले.

'विहारी, चल आमच्याबरोबर. युध्द सुरू झाले आहे. प्रत्येकाने देशासाठी लढायला आले पाहिजे.' ते म्हणाले.

'मला नका नेऊ.'

'राजाची आज्ञा आहे.'

'कोण नेतो माझ्या मित्राला पाहू. हा मी येथे उभा आहे. होऊ देत दोन हात.' विजय तलवार सरसावून म्हणाला.

'विहारी, तुझ्या या कोवळया मित्रास गप्प बसव. तू बर्‍या बोलाने चल. नाही तर दोघे प्राणास मुकाल. तुम्ही दोघे आहात. आमची पलटण तेथे उभी आहे. बसा या घोडयावर, निघा.'

विहारीने विजयची समजूत घातली. ते दोघे एकमेकांस कडकडून भेटले. विहारीच्या डोळयांना पाणी आले. गेला. विहारी गेला. डोळयांआड झाला. प्रेमळ, शूर, विनोदी मित्र गेला. पुन्हा विजय एकटा. देवाने मला का एकटे राहण्यासाठीच जन्माला घातले? मुक्ताची व माझी ताटातूट. विहारीची नि माझी ताटातूट. मी यती व्हावे, निस्संग व्हावे, सर्व पाशांतून मुक्त व्हावे, मी एखाद्या व्यक्तीचे न होता सर्व जगाचे व्हावे अशीच का देवाची खरोखर इच्छा आहे? मी यती होऊ की पती होऊ? संन्यासी होऊ की संसारी होऊ? देवाच्या इच्छेविरुध्द का मी जात आहे? असे विचार करीत तो पुढे निघाला.

« PreviousChapter ListNext »