Bookstruck

राजगृहात 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'अप्रतिम, खरेच अप्रतिम.' तो धनी म्हणाला.

'कोणाला दाखवू ही?'

'मी ही घेऊन सरदाराकडे जाईन. त्याच्या मुलीला चित्रकलेचा फार नाद. तिला ही चित्र पसंत पडतील.'

'तुम्हाला एक विचारू का?'

'विचारा.'

'येथून कनोजकडे जाणारा एखादा व्यापारी भेटला तर त्याच्याबरोबर पत्र द्यायचे आहे.'

'माझ्याकडे पत्र देऊन ठेवा. सर्व हिंदुस्थानचे व्यापारी येथे येतात.'

विजयने आपल्या भावाला, अशोकला पत्र लिहिले व त्यात एक पत्र मुक्ताला लिहिले. प्राणावरची नवीन संकटे, त्यांतून सुटका कशी झाली ते सारे लिहून आता मी राजगृहात आहे, तू तेथे पत्र पाठव. मला मिळेल. असे त्याने लिहिले होते. त्याने आपल्या घरमालकाचा पत्ता दिला होता.

विजयने पत्र आपल्या घरमालकाजवळ दिले.
'व्यापार्‍याकडे या पत्राचे उत्तर येईल. आपल्याकडे आणून देतील पत्र आले तर.' तो मालक म्हणाला.

पत्र गेले.

विजयची चित्रे एके दिवशी घरमालकाने त्या सरदाराकडे नेली. सरदाराची मुलगी सुलोचना आपल्या चित्रशाळेत बसली होती. चित्रे घेऊन तो मालक तिच्याकडे आला. तेथे एका आसनावर बसला. सुलोचना ती चित्रे पाहून प्रसन्न झाली.

'सुंदर आहेत चित्रे. त्या चित्रकारांना माझ्याकडे घेऊन याल?' तिने विचारले.

'केव्हा आणू?'
'उद्या तिसर्‍या प्रहरी आणा.'

तो विजयचा घरमालक निघून गेला. विजय आज जरा संचित बसला होता. तो ही आनंदाची वार्ता घेऊन त्याचा घरमालक आला.

दुसर्‍या दिवशी विजय आपल्या त्या घरमालकाबरोबर सुलोचनेकडे आला. सुलोचनेने त्याचा सत्कार केला.

« PreviousChapter ListNext »