Bookstruck

राजगृहात 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

'ही पाहा माझी चित्रे; परंतु रंगांची मिसळ मला अद्याप साधत नाही.' ती म्हणाली.

'कठीणच आहे ती गोष्ट. सायंकाळी आकाशातील रंग पाहावे. तेथे शेकडो रंग कसे एकमेकांत मिसळून गेलेले असतात किंवा फुलांच्या पाकळया पाहा. काही पाकळयांतून निरनिराळे रंग असतात; परंतु एक रंग कोठे संपला व दुसरा कोठे सुरू झाला हे लक्षात येत नाही. गोकर्णाचे फूल पाहा तुम्ही. निळा व पांढरा रंग कसा मिसळून गेलेला असतो किंवा लहान मुलाच्या गालांचा रंग, पांढरा व गुलाबी रंग त्यात कसा असतो मिसळलेला!'

'तुम्ही कोणत्या देशचे?'   

'मी असाच एक फिरस्ता आहे.'

'तुम्ही एकटेच आहात?'

'दुर्दैवाने सध्या एकटाच आहे.'

'तुम्ही रोज माझ्याकडे येत जा. तुम्ही माझे कराल एक चित्र तयार? मी अशी येथे समोर बसेन. तुम्ही माझे चित्र काढा. काढाल?'

'हो काढीन.'

'तुम्ही कधी असे कोणाचे काढले होते चित्र?'

'कल्पनेने काढले होते.'

'समोर कोणी स्त्री बसली आहे व तिच्याकडे पाहून काढीत आहात, असे कधी काढले होतेत?'

'नाही?'

'माझे काढा हं. तुमच्या हातची आठवण राहील आणि त्या निमित्ताने तुम्ही बरेच दिवस या शहरात राहाल. नाही तर जायचेत उडून! खरे ना?'

« PreviousChapter ListNext »