Bookstruck

सर्वनाश 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एके दिवशी बैलगाडीत बसून ती शिरसमणीस आली. ते पत्र तिने सर्वांना वाचून दाखविले. शशिकांतला सर्वांनी घेतले. मुक्ताला मुलगा झाल्यापासून बलदेव व पार्वती तिच्यावर फारच ममता करू लागली होती. मंजुळेने हे पत्र वाचले.

'देवच त्याला सांभाळीत आहे. गुणी पोर.' बलदेव म्हणाला.   

'कधी कृष्टीस पडेल असे झाले आहे.' पार्वती म्हणाली.

'येईल हो आई लौकर.' मंजुळा आशेने व प्रेमान म्हणाली.

मुक्ता जायला निघाली.

'मुली, दोन दिवस राहा ना आमच्याकडे.' बलदेव म्हणाला.

'वैनी, राहा ना ग. शशिकांताला मी खेळवीन.' मंजुळा म्हणाली.

गाडीबरोबर रुक्मा आला होता. त्याच्याबरोबर शेवटी निरोप पाठवला गेला की, मुक्ता दोन दिशी येईल म्हणून.

मुक्ताला आज आनंद झाला होता. सासरच्या प्रेमामुळे ती आज राहिली होती. विजयवर ज्या अनेक विपत्ती प्रवासात आल्या, त्यामुळे बलदेवांचे हृदय अगदी वितळून गेले होते. लहानग्या शशिकांतचे कोण कौतुक चालले होते.

दुसर्‍या दिवशी मुक्ता माईजींकडे गेली. शशिकांतला माईजींनी घेतले. 'डोळे कसे विजयच्या डोळयांसारखे आहेत.' त्या म्हणाल्या.

'मुक्ता, एक मोठा व्यापारी आला आहे. तो जायचा आहे. तो तुझे पत्र नेईल. दे लिहून.' माईजी म्हणाल्या.

'माईजी, तुम्हीही लिहा ना पत्र.' ती म्हणाली.

'बरे हो. मीही लिहिन.' माईजी म्हणाल्या.

दोन्ही पत्रे तयार झाली. मुक्ताने लहानसेच परंतु गोड पत्र लिहिले होते. माईजींनीही 'आता ये, धोका नाही. राजा प्रसन्न आहे. तो ग्रामणीवरच रागावला. तू तुरुंगातून पळालास त्याचे राजाने कौतुक केले व तुझे करणे योग्य होते, असे राजा हसत म्हणाला.' वगैरे लिहिले होते.


« PreviousChapter ListNext »