Bookstruck

सर्वनाश 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ती दोन्ही पत्रे एका मोठया लखोटयात घालण्यात आली.

'परंतु ही पत्रे नेऊन कोण देईल?' माईजी म्हणाल्या.

'सुमुख नेऊन देतील.' मुत्ताच म्हणाली.

पत्रे घेऊन मुक्ता आली.

'सुमुख, ही पत्रे त्या व्यापार्‍याला नेऊन द्याल? नीट चौकशी करा हो.' मुक्ताने सांगितले.

'तो व्यापारी येथून गेला; परंतु मी पळत जातो. त्याला गाठतो. काळजी नका करू. विजयला पत्रे. होय ना?' त्याने विचारले.
'होय सुमुख.' ती आनंदाने म्हणाली.

सुमुखने ती पत्रे नेली. त्याने ती पत्रे फोडली. वाचली. त्याचा मत्सर आज पुन्हा जागृत झाला. त्याने ती दोन्ही पत्रे न देता तिसरेच एक लिहिले. काय लिहिले त्याने त्या पत्रात? त्याने मुक्ता मरण पावली, असे लिहिले होते. खाली माईजींच्या हस्ताक्षरासारखी त्याने त्यांची सही केली. विजयचे त्या पत्रात समाधान केलेले होते.

'आता कला हीच तुझी पत्नी किंवा भिक्षू हो. धर्म तुला शांती देईल. पती होणे तुझ्या नशिबी एकंदरीत नव्हते. आता यती हो. देवाची तीच इच्छा दिसते-' असे लिहिले होते. सुमुखने ते पत्र बंद करून त्या व्यापार्‍याच्या हाती दिले. माईजींनी दिलेले पत्र म्हणून त्या व्यापार्‍याने ते मस्तकी धरले. पत्रावर विजयचा राजगृह येथील पत्ता होता.

सुमुख परत आला.

'भेटला का व्यापारी?' मुक्ताने विचारले.

'हो. पळत गेलो व गाठले त्याला. आता विजयला पत्र मिळेल.'

'शशिकांताचे बाबा लौकर येतील.' मंजुळा म्हणाली.

'येऊ दे एकदा सुखरूप घरी.' आई म्हणाली.

इकडे राजगृहात विजय अलीकडे फारसा बाहेर पडत नसे. सुलोचनेला वाटले की, आपल्या सांगण्याप्रमाणे खरोखरच विजय गेला. एके दिवशी सायंकाळी विजय बाहेर पडला. तो फिरत फिरत गंगातीरी गेला. तेथे किती तरी वेळ बसला. गंगेचा प्रवाह किती सुंदर दिसत होता!



« PreviousChapter ListNext »