Bookstruck

चित्रेचे लग्न 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘मला नाही आवडत विडा करायला. चुन्यात बोट घालायचे.’ चित्रा म्हणाली.

‘परंतु खायला आवडतो ना?’ पित्याने हसून विचारले.

‘कोणी करून दिला तर मी खाते. फातमाला पान फार आवडे. तिच्या आजोबांच्या तोंडात तर नेहमी पान असायचे. फातमा मला पट्टी करून देत असे. माझे छान रंगे तोंड. फातमाचे नसे रंगत. मग मी काय म्हणायची, बाबा, आहे का माहीत?’

‘काय ग म्हणस?’

‘फातमा, तुझ्यावर कोणाचे प्रेम नाही. तुझा विडा रंगत नाही. माझ्यावर सर्वांचे प्रेम आहे. माझा विडा रंगतो आणि फातमा म्हणे, तुझेही नाही का माझ्यावर प्रेम? मग मी हसत म्हणे, तुला कळत नाही, काही समजत नाही.

फातमा मग मला चिमटा घेई. जणू सारे समजले असे दाखवी.’

इतक्यात चारुने सुरेख विडा तेथे हळूच करून ठेवला. तो उठून गेला.
चित्राने तो हळूच उचलून खाल्ला.

‘पडा जरा.’ जहागीरदार बळवंतरावांस म्हणाले.

‘चित्रा तू पण पड आणि गेलीस झोके घ्यायला, तर फार उंच नको हो झोके घेऊस.’ पिता म्हणाला.

बळवंतरावांनी वामकुक्षी केली. चित्राही जरा तेथे लवंडली. जहागीरदारही बाहेर झोपले. चारु मात्र मळ्यात होता.

थोड्या वेळाने चित्रा उठली. ती मळ्यात गेली. झाडाला बांधलेला झोका तिला दिसला. ता तिकडे गेली. झोक्यावर झोके घेऊ लागली; परंतु तिला भीती वाटत होती. इतक्यात चारु तेथे आला. तिचे झोके थांबले. ती खाली उतरली.

‘उतरलातशा?’ त्याने विचारले.

‘तुम्हाला खुप उंच नेता येतो का हो?’

‘हो’

‘मला दाखवा बरे.’

चारु झोक्यावर चढला आणि हळुहळु त्याने खूपच उंच झोका नेला. शेवटी तो खाली आला.

‘मला नेता येईल का इतका उंच?’

‘हो’

‘पडायची नाही ना?’

« PreviousChapter ListNext »