Bookstruck

चित्रावर संकट 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

चित्रा काही दिवस माहेरी गेली होती. आईच्या हातचे खायला गेली होती. प्रेमळ वातावरणात गेली होती. तिची प्रकृती बरी होती. सासूने हाल केले वगैरे तिने काही सांगितले नाही.

‘आई फातमाचा लागला का ग पत्ता?’ तिने विचारले.

‘लागला असता तर कळवला असता. तिचे आजोबा वारले. लग्न झाल्यावर ती नव-याकडे गेली; परंतु नवरा कोठे असतो ते कळले नाही.’

‘आई, आता परत कधी मला आणाल?’

‘बाळंतपणासाठी ये.’

‘आई, तुला मी एक सांगू?’

‘काय ग?’

‘काही नाही.’

‘सांग. का नाही सांगत?’

‘मनात येते एखादे वेळेस की, पुन्हा तुमची-माझी भेट होणार नाही. कदाचित मी मरेन.’

‘हे काय वेडे वेडे मनात आणतेस? असे नको हो मनात आणू. चांगला नवरा मिळाला आहे. सुखाचा संसार कर. आज ना उद्या मुलबाळ होईल.’  सारे चांगले होईल. वेडी आहेस तू चित्रा!’

‘आई, मनात येते ते सांगूही नये का?’ तू मायेची म्हणून तुझ्याजवळ म्ह़टले.’

‘परंतु आनंदात राहा. समजलीस? तुला लवकर लवकर आणीत जाऊ हो बाळंतपणालाच येशील असे वाटले होते, परंतु एखादीला नाही होत लवकर मूल. म्हणून का कंटाळलीस? का सासू काही म्हणाली? होईल मूल. अजून का वय गेले? हे सतरावे वर्ष. चांगली हस, खेळ. मनाला नको बाई लावून घेऊ.’

चित्रा उठून गेली. माहेरी ती लोकरीचा स्वेटर करीत होती. चारूसाठी स्वेटर. त्यात तिचा वेळ जाई. स्वेटर तयार झाला. सासरी जायची वेळ आली. चारू, न्यायला आला होता. चार दिवस आनंदात गेले. मेजवानी झाली.

‘स्वेटर घालून पाहा ना.’

‘घरी गेल्यावर घालीन.’

‘चारू, जेथे तू नि मी आहो येथे आपले घरच. येथे आहत ना आता दोघे, मग येथे घर. घाल. मला बघू दे.’

« PreviousChapter ListNext »