Bookstruck

चित्रावर संकट 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

चारूने स्वेटर घातला.

‘छान दिसतो तुला!’

‘आता कोणाला करशील?’

‘पुढे कधी बाळ होईल, त्याला करीन.’

‘मला आला असता, तर मी तुझ्यासाठी केला असता. खरेच!’

‘वेडा आहेस तू चारू. बायकांचा जन्म का नाही घेतलास?’

‘पुढच्या जन्मी आपण अदलाबदल करू.’

‘चारू, उद्या निघायचेच का?’

‘झाले आता चार दिवस. पुरे नाही का?’

‘होय हो. पुरे. जाऊ हो उद्या.’

चित्रा व चारू गोडगावाला आली. सासूबाईंचा स्वभाव अद्याप पूर्ववतच होता. चित्राला मूलबाळ होणार नाही, तू दुसरे लग्न कर, असा आग्रह सासूचा चारूला
सुरु झाला होता; परंतु चारू तिकडे लक्ष देत नसे.

परंतु अकस्मात चमत्कार झाला. सासू आता चांगली वागू लागली. चित्रावर पोटच्या मुलीवर करावी तशी माया करू लागल्या. त्यांनी तिच्यासाठी लाडू केले. तिला उजाडत लाडू खायला देत. तिला आता काम सांगत नसत. गोड बोलत. तिला जवळ घेत.

‘चित्रा, उगीच तुला त्रास दिला हो. जा हो ते विसरून. यापुढे तुला जणू मुलगी मानीन. तुला लागेल गे माग. समजलीस ना! प्रकृतीची काळजी घे. चारू तुला टॉनिक देत असे मागे, त्याची बाटली आणवू का पुन्हा?’

‘नको हो आई. आता बरी आहे प्रकृती, तुम्ही प्रेम द्या म्हणजे सर्व काही मिळाले.’

‘देईन हो बाळ.’

‘आता अगदी शुक्लपक्ष होता. चित्राच्या संसारात प्रेमाचे व सहानभुतीचे चांदणे होते. दु:ख, शोक, चिंता यांना जागा नव्हती.’

‘चित्रा, मी नव्हतो सांगत की, आई पुढे निवळेल म्हणून?’

‘मलाही वाटत होते की, ज्यांच्या पोटी चारू येतो त्या कायमच्या कठोर कशा राहातील?’

‘आता तू सुखी आहेस ना?’

« PreviousChapter ListNext »