Bookstruck

चित्राचा शोध 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आज दोन-तीन वर्षे त्यांच्याकडे तो टिकला होता. चित्राचे लग्न झाले नि भोजू कामाला लागला. बळवंतरावांना भोजू गडी फार आवडे. त्यांचा त्याच्यावर फार विश्वास.

‘काय साहेब?’ त्याने येऊन विचारले.

‘भोजू मी गावाला जाणार आहे. आमची चित्रा हरवली आहे. शोधायला जात आहे. तू घर सांभाळ. तुझ्यावर सोपवून जात आहे.’

‘चित्राताई अशा कशा हरवल्या? मी जाऊ का शोधायला? मी आणतो त्यांना शोधून. जाऊ का?

‘भोजू, माझे प्रयत्न हरल्यावर तू जा.’

‘सापडतील चित्राताई. माझे मन सांगते की सापडतील.’

‘तुझ्या तोंडात साखर पडो. निर्मळ व शुद्ध माणसांना सत्य कळते. माझी तयारी कर. वळकटी बांध. कपडे फार नकोत, समजलास ना?’

भोजूने सारी तयारी केली. तो सामान घेऊन स्टेशनवर गेला. तिकीट काढून थांबला होता. रावसाहेब आले. भोजूने तिकीट दिले.

‘भोजू. सांभाळ हो सर्वांना. मी पत्र पाठवीनच. हुशारीने राहा.’

‘होय साहेब.’

गाडी सुटली व भोजू घरी आला. बळवंतराव गोडगावाला गेले. अद्याप जहागीरदार घरी आले नव्हते. चारू घर सोडून गेलाच होता.

‘काय हो, काय आहे हकीगत माझ्या मुलीची? सारे सांगा तरी एकदा.’ बळवंतराव दु:खाने म्हणाले.

‘माझ्या तोंडाने सांगवत नाही. पहिल्यापासून माझे मत होते की, तुमची मुलगी नको म्हणून; परंतु या सर्वांचा हट्ट. मीसुद्धा शेवटी तिच्यावर प्रेम करू लागल्ये. तिला माझ्यावर नेली. म्हटले, देवीला नवस करू. पुत्र होईल, परंतु तिथे कोणाबरोबर पळून गेली. तोंडाला काळोखी फासून गेली. आमची मान खाली. सारे लोक टिंगल करीत आहेत. हा चारूही कोठे गेला. तुमच्या मुलीने सारा सत्यानाश केला आमचा. अब्रू गेली. मुलगाही कोठे गेला. पत्ता नाही. एकुलता आमचा मुलगा.’ असे म्हणून ती दुष्ट सासू खोटे खोटे रडू लागली.

‘तुम्ही काही म्हणा. चित्रा असे करणार नाही. कोणी तरी तिला पळवले असेल. असतात अशा टोळ्या. माझी चित्रा देवता आहे. तारणारी देवता. ती सत्यानाश करणारी नसून सर्वांचे मंगल करणारी आहे. ती जन्माला आली व मी मामलेदार झालो. तिच्या पूर्वी झालेली सारी मुले मेली; परंतु ती जगली आणि तिच्या पाठीवरचीही जगली. आमच्या घरात संतती, संपत्ती, आनंद तिच्यामुळे आला. ती प्रेमळ व निर्मळ आहे. भोळी आहे. तिला कोणाची शंका येत नाही. सर्वांवर प्रेम करील. सर्वांना जवळचे देईल. सापडेल. कोठे तरी सापडेल माझी चित्रा.’ असे म्हणून बळवंतराव बाहेर बैठकीच्या जागी गेले. जेवण करून गोडगाव सोडून तेही चित्राच्या शोधार्थ सर्वत्र हिंडू लागले. सापडेल का चित्रा?

« PreviousChapter ListNext »