Bookstruck

चित्रेच्या वडिलांना वेड लागते 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

बळवंतरावांनी सर्वत्र शोध केला, परंतु चित्राचा पत्ता नाही. त्यांची रजाही संपली. अधिक रजा मिळणे शक्य नव्हते. ते परत आले. कामावर रूजू झाले; परंतु त्यांचे कशात लक्ष लागेना. कामातही लक्ष लागेना. बळवंतरावांना एकदम मामलेदारी मिळाली होती. त्याचे काहींना वैषम्य वाटत होते. बळवंतरावांचा मत्सर करणारे लोक होते. खुद्द त्यांच्याच कचेरीत असे लोक होते. बळवंतराव अलिकडे कामाविषयी जरा बेफिकीर होते. ते काही गावांना न जाताच त्या गावी जाऊन आलो म्हणून कामाच्या डायरीत लिहीत. त्यांच्या आता लक्षातही फारसे राहात नसे. त्यांचा मेंदू काम देईनासा झाला.

या संधीचा दुष्टांनी फायदा घेतला. कलेक्टरकडे निनावी पत्रे गेली. मामलेदारसाहेब न हिंडताफिरताच डायरी वगैरे भरतात असे कळवले गेले. कलेक्टर जरा कडवा होता तो अकस्मात एके दिवशी येऊन दाखल झाला. चौकशी करू लागला. कामाची डायरी पाहू लागला.  ‘या गावांना गेले होतेत का तुम्ही? नोंद तर आहे. गेले होतेत का?’
कलेक्टरने विचारले.’

‘मला आठवत नाही.’

‘सरकारी काम म्हणजे का हजामती? आठवत काय नाही? बिनआठवणीचा अधिकारी काय कामाचा? येथे गावांची नावे भराभरा लिहायला बरी आठवली!’

‘गेलो असेन मी.’ बळवंतराव म्हणाले.

‘शिपाई, त्या गावांचे पाटील बाहेर आले आहेत, त्या सर्वांना बोलवा आत.’ साहेबांचा हुकूम झाला.

ते पाटील आत येऊन उभे राहीले.

‘हे तुमच्या गावांना गेल्या आठपंधरा दिवसांत आले होते का?’

‘नाही आले. आम्ही बोलावले होते. लोक आणेवारीची तक्रार करीत आहेत.’

‘काय हो हे पाटील का. म्हणतात?’

‘मला काही कळत नाही.’

‘ठीक. तुम्हाला कळेल असे करतो हां. जा.’

बळवंतराव खरेच निघून गेले. ते बाहेर जाऊन बसले. थोड्या वेळाने घरीच निघून गेले. कलेक्टरने कडक रिपोर्ट वर केला. बळवंतरावांना नालायक ठरवण्यात आले; परंतु सरकारने, त्यांनी सक्तीची काही महिने रजा घ्यावी असे सांगित. जर पुढे कार्यक्षम दिसले तर पुन्हा कामावर घेण्यात येईल असे कळविले. बळवंतरावांना हा मोठाच धक्का होता. सार्वजनिक जीवनाच्या दृष्टीने ही बेअब्रू होती. तिकडे मुलीचा पत्ता नाही. इकडे नोकरीवरून बडतर्फ. पुन्हा कामाला नालायक हा शिक्का! सरकारदरबारी बेअब्रू. बळवंतराव खोलीत सचिंत होऊन बसले. काय करावे ते त्यांना सुचेना.

‘भोजू,’ हाक मारली.

‘काय साहेब?’

‘चित्रा आली का?’

‘नाही साहेब. कोठून येणार?’

‘तू म्हणाला होतास ना की येईल म्हणून?’

‘अजून सुद्धा म्हणतो. धनी, घोर नका करू. सारे चांगले होईल. देव सत्त्व
पाहातो आहे.’

« PreviousChapter ListNext »