Bookstruck

आमदार हसन 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘बाबा, ती जरा आजारी आहे.’

‘आणि दिलावर आजारी आहेत वाटते?’

‘त्यांनाही जरा बरे नाही.’

‘काय होते त्यांना?’

‘मी लवकरच सांगेन त्यांना काय होते ते.’

जेवणे झाली दिलावरचा चेहरी खिन्न होता. त्याला काही तरी दु:ख होत होते. शल्य खुपत होते.

‘चित्रा, ही घे पानपट्टी. तुझा विडा रंगेल आणि माझाही आता रंगतो हो! दिलावर, ही तुला घे. बाबा, ही तुम्हाला!’

‘फातमा, मला शेवटी वाटते!’

‘बाबा, बसा सारी. मी तुम्हाला ज्या कामासाठी बोलावले ते आता सांगते. दिलावर बसा. चित्रा, बस.’

सारी बसली आणि फातमाने चित्राची सारी हकीगत पित्याला निवेदिली. दिलावर काळा ठिक्कर पडला. आमदारसाहेब गंभीर झाले.

‘दिलावर. तुम्ही इस्लामी धर्माला काळोखी फासतील. काय हे? परंतु अद्याप मर्यादेत आहात. या मुलीच्या अब्रूचे तरी धिंडवडे केले नाहीत. माझ्याजवळ का नाही मागितलेत पैसे?’ पैशासाठी का मुली पळवाव्या, विकाव्या? कोठे हे पाप फेडाल? किती आहे कर्ज? मी सारे फेडतो. पुन्हा कर्ज नका करू. जरा बेताने वागा. उद्या खटला झाला तर काय होईल? माझ्या तोंडाला काळीमा. चित्रा. तू माझ्याबरोबर चल बेटा. मुंबईला पुष्कळ, आमदार माझ्या ओळखीचे आहेत. हिंदू आमदार. त्यांच्याकडे तुला नेतो. तुझ्या पित्याचा व पतीचा शोध करतो. हो. दिलावर, फातमा होती म्हणून ही गरीब गाय वाचली. तिची क्षमा माग. तिला चोळीबांगडी दे. आता तिचा भाऊ हो. ती तुझी बहीण मान. दरसाल दिवाळीला तिला भाऊबीज पाठव. भेट पाठव.’

दिलावर माफी मागितली. फातमाने आणून ठेवलेली भेट त्याने चित्राला दिली. सर्वांना आनंद झाला. फातमा व चित्रा दोघी निघून गेल्या. आमदार व दिलावर बोलतबोलत घोरू लागले.

« PreviousChapter ListNext »