Bookstruck

आनंदी आनंद 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

‘आई नमस्कार करत्ये.’ चित्रा म्हणाली.

‘तुझी आता खरीखुरी आई होईन हो. आता नाही हो राग करणार! चित्रा, चारू क्षमा करा मला. बाळ, तू घर सोडून गेलास नि कधी गोडाला स्पर्श नाही हो केला.’

‘आई, आता आपण आनंदात राहू.’

‘होय हो, राहू.’

खरेच, आनंदीआनंद झाला. सासू आता मनापासून चित्रावर प्रेम करी. ती खरी आई झाली.

चित्राने फातमाच्या मोलकरणीसाठी शंभर रूपये फातमाकडे पाठवून दिले. फातमाला गोड पत्र लिहिले. फातमाचेही आले.

असे दिवस आता आनंदात जात होते. काही महिने गेले. एके दिवशी फातमाचे गोड पत्र आले होते. चित्रा वाचीत होती. मंद हास्य तिच्या तोंडावर होते. चारू दारातून पाहात होता.

‘चित्रा, काय आहे त्या पत्रात?’

‘आनंदाची वार्ता फातमाने लिहिली आहे. तिला बाळ होणार आहे. तुझा पायगुण असे लिहिले आहे.’

‘तू नाही वाटते तिला तुझी वार्ता कळवलीस?’

‘बाळ पाळण्यात पडला म्हणजे कळवीन.’

‘परंतु तुझे बाळंतपण येथे करायचे की माहेरी?’

‘तुझ्या मळ्यात होऊ दे माझे बाळंतपण. सीतादेवी वाल्मीकींच्या आश्रमात प्रसूत झाली. मी माझ्या फुलांच्या, केळींच्या मळ्यात होईन. हसतोस काय चारू?’

‘तू वेडी आहेस म्हणून हसू येते.’

‘वेड्या बापाची वेडी मुलगी! खरे ना?’

दोघे गोड हसली. किती त्यांचे प्रेम! त्या प्रेमावर दृष्ट न पडो. चित्रा नि चारू यांचा संसार सुखाचा होवो!

« PreviousChapter List