Bookstruck

बापूजींच्या गोड गोष्टी 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



मित्रांनो, महात्माजींच्या जीवनरामायणातील आज दुसरी गोष्ट मी सांगणार आहे. मला फार वेळ नसतो. म्हणून मी छोट्याछोट्या गोष्टीच सांगेन. मोठ्या गोष्टी तुम्ही मोठे व्हा नि वाचा. खरे ना?

बेळगावला १९२४ मध्ये राष्ट्रीय सभेचे (काँग्रेसचे) अधिवेशन होते. श्री गंगाधरराव देशपांडे व इतर कार्यकर्ते यांनी केवढी व्यवस्था ठेवली, केवढा सोहळा मांडला! सारे सुखावले, आनंदले. महात्माजी कार्यमग्न होते. तेट तेथल्या काँग्रेसचे अध्यक्ष होते. काँग्रेसची बैठक संपली. सारे जायला निघाले. कोणी आजूबाजूची निसर्गरम्य स्थळे पाहायला गेले. एक कार्यकर्ते गांधींकडे आले आणि म्हणाले:

‘गांधींजी, शरावतीचा धबधबा पाहायला तुम्ही याल? हिंदुस्थानातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच असा हा धबधबा आहे. आठशे फूट उंचावरून तो पडतो. भव्य असे दृश्य आहे. याल का? महादेवभाई, काकासाहेब यांनाही यायची इच्छा आहे. तुम्ही याल तर तेही येतील. नाही म्हणू नका!’

‘मी कसा बरं येऊ? मी का आता स्थळं पाहत हिंडू? काम किती पडलं आहे! महादेवालाही नाही येता येणार. काकांना न्या.’

‘गांधीजी, इतक्या उंचावरून पडणारा तो धबधबा खरोखरच प्रेक्षणीय आहे! कसे तुषार उडतात, कशी इंद्रधनुष्ये दिसतात! किती उंचीवरून पाणी पडतं आहे! आपण गंभीर निसर्गाच्या, मूर्तिमेत अनन्ततेच्या अगदी सन्निध आहोत, असं वाटतं. तुम्ही पाहिला आहे एखादा धबधबा? उंचावरून पडणारा?’

‘हो कितीदी तरी पाहिला.’

‘शरावतीइतका उंच?’

‘तिच्याहूनही उंच.’

‘शरावतीइतका धबधब्याहून उंच असा धबधबा सा-या जगात नाही. आम्ही तरी भूगोलात वाचला नाही.’

‘भूगोलात नसेल, परंतु मी डोळ्यांनी तो कितीदा तरी पाहतो. आणि तुम्हीही तो पाहिला आहे. किती उंचावरून ते पाणी पडतं!’

‘कोठली ही नदी? कोठलं हे पाणी? आम्ही काही पाहिलं नाही.’

‘पावसाचं पाणी! पर्जन्यधारा किती उंचावरून पडतात! ते पाणी ‘शरावतीच्या पाण्यापेक्षा अधिक उंचीवरून नाही पडत? मी खरं सांगितलं की नाही?’

सारे हसले. महात्माजीही हसले. काकासाहेब नि इतर मंडळी धबधबा बघायला गेली. महात्माजींनी त्यांना जाण्यास सागितले. परंतु ते आपल्या कार्यात मग्न झाले.

महादेवभाई पुढे पुष्कळ दिवसांनी एकदा कामासाठी म्हैसूरला गेले असता त्यांनी तो धबधबा पाहून यावे म्हणून गांधींजींनी व्यवस्था केली होती.

« PreviousChapter ListNext »