Bookstruck

बापूजींच्या गोड गोष्टी 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »



आज मी जरा गंभीर गोष्ट सांगणार आहे. महात्माजींनी सर्व प्रकारची भीती प्रयत्नपूर्वक आपल्या जीवनातून काढून टाकली होती. ते निर्भय झाले होते. निर्भयता म्हणजेच मोक्ष. संस्कृतात वचन आहे :

‘आनंदं ब्रह्मणो विद्वान् न बिभेति कदाचन’ याचे मी मराठी करून सांगू? ऐका.

‘ब्रह्मानंदास जो जाणी, नसे त्यास कुठे भय.’

महात्माजी चरातरांत स्वत:चा आत्मा बघत. मग जेथे आपलाच आत्मा बघायचा, तेथे कोणी कोणाची भीती धरायची? खरे ना?

मी सांगणार आहे तो प्रसंग असा :

रौलेट कायद्याविरुद्ध प्रचंड चळवळ देशभर महात्माजींनी केली. त्यांतून जालियनवाला बागा झाल्या. त्यांतून असहकार, कायदेभंग पुढे येणार होते. दौरे काढून थकले भागलेले महात्माजी आश्रमात आले होते. त्या वेळेस आश्रम लहान होता. तीन चार वर्षे तर स्थापून झाली होती. विनोबाजींसारखे, आप्पासाहेब पटवर्धनांसारखे तेजस्वी, ध्येयार्थी साधक आश्रमाला येऊन मिळाले होते. आणि १९१९ मधील २ ऑक्टोबरचा दिवस आला. गांधीजींना ५० वर्षे पूरी होऊन ५१ वे आज लागणार होते. आश्रमीयांनी लहानसा आनंद समारंभ करण्याचे ठरविले. हार, माळा, तोरणे लावून सर्वत्र शोभा आणण्यात आली. समारंभाची वेळ झाली. गांधीजी येऊन बसले. सभोवती सत्यार्थींचा मेळावा होता. जणू चंद्राभोवती तारे, सूर्याभोवती किरण, कमळाभोवती भुंगे. गांधीजी बोलू लागले. ते म्हणाले,

‘आज मला ५० वर्षं पुरी झाली. म्हणजे माझी निम्मी हयात गेली. आता थोडी वर्षं राहिली. मला ५१ वं नवं वर्ष लागलं. पन्नाशी उलटली म्हणून तुम्ही आनंद दाखवीत आहात. माझा एक्कावन्नावा जन्मदिन आला म्हणून मोठ्या खुषीत आहात. प्रभूला तुम्ही धन्यवाद देत आहात. ठीक. आणि या माळा, हे हार यांची मला विशेष गोडी नाही. परंतु तुम्ही प्रेमानें सारं केलं आहे. तुमची भावना मी जाणू शकतो. ठीक आहे. परंतु मला जी एक गोष्ट सांगायची आहे ती विसरू नका. तुम्ही माझा वाढदिवस जितक्या आनंदानं साजरा करीत आहात, तितक्याच आनंदानं माझ्या मृत्यूचा दिवसही तुम्ही  साजरा करा. आज ज्याप्रमाणे प्रभूचे आभार मानीत आहात, त्याचप्रमाणे त्यानं मला नेलं, म्हणजेही त्याचे कृतज्ञतापूर्वक आभार माना. जीवन व मरण दोन्ही त्याच्याच मंगल देणग्या. नाहीतर माझ्या मरणाच्या वेळेस जर रडत बसलात तर हा विनोबा इथं सारखी गीता वाचतो, त्याचा काय उपयोग?’

महात्माजींनी मरणाचे भय आपल्या मनातून आफ्रिकेत असल्यापासून संपूर्णपणे काढून टाकले होते. ते मुक्त पुरुष होते.

« PreviousChapter ListNext »