Bookstruck

बापूजींच्या गोड गोष्टी 33

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

३४

१९१९-२० मधील ते तेजस्वी दिवस. गांधीजी देशभर विजेसारखे संचरत होते. आसाममधील दौरा सुरू झाला. आसाममध्ये दळणवळणाची फार गैरसोय. सर्वत्र प्रचंड नद्या. उंच पर्वत, खोल दरीखोरी. गाड्या फारशा नाहीत. एकदा एक गेली, दुसरी केव्हा येईल नेम नाही. एकदा तर मालगाडीच्या डब्यातून जावे लागले.

रात्रीची वेळ होती. गांधीजींना एका डब्यात बसवण्यात आले होते. त्या छोट्या डब्यात ते एकटेच होते. रात्रभर विसावा मिळावा, ही इच्छा. परंतु गाडीचे मागचे डबे सुटले नि रुळावर कसेच राहिले. पुढची गाडी पुढे गेली. गार्ड मध्ये होता. त्याच्या लक्षात ब-याच अंतरावर आले की, मागचे काही डबे सुटून गेले आहेत. गाडी थांबली. गांधीजींचा डबा कोठे आहे? तो मागे राहिला! कार्यकर्ते चिंतातुर झाले. पाठीमागून एखादी गाडी आली तर? गाडी हळूहळू मागे नेण्यात येऊ लागली. कार्यकर्ते डब्याच्या फळ्यांवर उभे होते. गांधीजींच्या डब्यावर एकदम गाडी जाऊन आदळू नये म्हणून दक्षता. आणि गांधीजींचा डबा दिसला. गांधीजी जागे झाले होते. स्मितमुखाने बसले होते.

‘बापू, केवढी आपत्ती आली होती!’ मित्र म्हणाले.

‘पाठीमागून गाडी आली असती! निसर्गाच्या मांडीवर जाऊन कदाचित पडलो असतो, गंमत!’ बापू मुक्त हास्य करीत म्हणाले.

« PreviousChapter ListNext »