Bookstruck

बापूजींच्या गोड गोष्टी 102

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

११३

हिंदुस्थानात २१ साली राजपुत्र आले होते तेव्हा गांधीजींनी त्यांच्यापुढे लोटांगण घातले अशी एक जुनी कल्पित कथा गोलमेज परिषदेच्या वेळेस एकाने छापली. गांधीजींना याबाबत विचारण्यात आल्यावर ते म्हणाले; ‘असल्या गोष्टी निर्माण करणारी कल्पनाशक्ती अर्थशून्य होय. मी हरिजन, भंगी यांच्यापुढं लोटांगण घालीन, त्यांच्या पायाची धूळ मस्तकी धरीन. परंतु राजासमोर मी कधीच लोटांगण घालणार नाही. मग राजपुत्रासमोर तर बोलूच नका. कारण उन्मत्त साम्राज्यशाही सत्तेची ती प्रतीकं आहेत. हत्तीनं मला चिरडलं तरी चालेल मी त्यांच्यापुढे नमणार नाही. परंतु चुकूनही मुंगीवर पाय पडला तर तिला मी नमस्कार करीन.’

११४


मीराबेन एका आरमारी अधिका-याच्या कन्या. गेलमेज परिषदेच्या वेळेस त्या बापूंबरोबर होत्या. एकजण मीराबेनकडे येऊन म्हणाला; ‘मी तुमच्या वडिलांच्या हाताखाली २१ वर्षे होतो. माझा जावईच गांधीजींसाठी शेळीचं दूध आणतो. मला त्यांची स्वाक्षरी मिळवून द्या. त्यांची भेट करवा.’ अखेर त्या माणसाची व गांधीजींची भेट झाली. तो म्हणाला, ‘तुम्हांला तुमच्या कामात यश येवो. मी मागील महायुद्धात भाग घेतला. परंतु पुन्हा झाले तर भाग घेणार नाही. युद्ध भयंकर वस्तू आहे. मी युद्धाला विरोध करीन. वेळ पडली तर तुरुंगात जाईन, तुमच्या ध्येयार्थ लढेन.’

‘तुम्हांला मुलंबाळं आहेत?’ गांधीजींनी विचारले.

‘हो. चार मुलगे व मुली, आठ जणं आहेत.’

‘मला फक्त चार मुलगे. शर्यतीत तुमच्याबरोबर निम्मा तरी आहे.’ गांधीजी हसून म्हणाले. आणि सगळ्यांची हसता हसता मुरकुंडी वळली.

« PreviousChapter ListNext »