Bookstruck

महात्मा गांधींचें दर्शन 23

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्रजाधर्माची वाढ : सौत्रामणियज्ञ

आपल्याकडे प्रजाधर्माची वाढ करता करता शेवटी क्रान्तीवर आले असे दिसून येईल. उन्मत्त राजांना यतींनी दूर करावे, नैतिक श्रेष्ठतेच्या लोकांनी दूर करावे असे सांगितले आहे. अशा राजांना हिंसेनेहि दूर करण्यांत येई. बेडूक राजा, दंडुका राजा (King Log and King Frog) या गोष्टींत हे दाखविले आहे की, लहान जुलूम दूर करायला जावे तर आणखी मोठा जुलूम  डोक्यावर येऊन बसतो. एका हुकुमशहाला दूर करावे तर आणखी प्रबल हुकुमशाही जन्माला येते. असे होऊ नये म्हणून आपल्याकडे सौत्रामणियज्ञ सांगितला आहे. दंगलच माजली तर ज्याचा विजय होईल, ज्याच्या हाती लष्करी सत्ता जाईल, तो सारी राज्यसत्ता बळकावून बसेल. शस्त्रबळाच्या प्राबल्यांतून लोकशाहीच्या ऐवजी हुकुमशाहीच जन्माला यायची. ती हुकुमशाही शुध्द राहील याचा काळ भरंवसा? म्हणून सौत्रामणियज्ञाचा संस्कार आपल्याकडे सांगितला आहे.  इंग्लंडमध्ये चार्लसची चौकशी केली गेली. वाटेल त्याने राजाला काढू नये. यति म्हणेल ''मी काढतो.'' सारे शांतीने व्हायला हवे. जुना राजा काढायचा, नवीन गादीवर बसवायचा. परंतु हे दंगलीने न करता, शिस्त, संयम, साधुता याने व्हावे. नैतिक शक्तीच्या थोर नेतृत्वाखाली असा सौत्रामणियज्ञ व्हावा; उन्मत्त राजाला दूर करण्याचा प्रयोग व्हावा.

लोकशाहीच्या कल्पना

आता लोकशाहीच्या कल्पना आल्या आहेत. आता एखादा पक्षच्या पक्ष प्रबळ होऊन बसतो. त्या विशिष्ट पक्षाच्या हाती सारी सत्ता एकटवते. अनिर्बंध, सर्वंकष सत्ता एक पक्षच हाती घेऊन बसतो. हा पक्ष जनतेच्या मनावर, शरीरावर जणूं अत्याचार करतो. ही लोकशाही नव्हे. असे होणे बरोबर नाही. परंतु येथे क्रान्ति कशी व्हायची? लोकशाहीतील क्रान्ति शांतीने व्हावी. डोकी फोडण्यापेक्षा डोकी मोजणे बरे. एकाच्या हातून सत्ता जेव्हा दुसर्याच्या हाती जाते तेव्हा हिंसा होण्याचा संभव असतो. परंतु लोकशाही राज्यसंस्थेत तिला आळा असतो. शान्ति, अहिंसा यांनी राज्यक्रान्ति करण्याचा तेथे प्रयोग शक्य असतो. जमनादासांच्या हातची सत्ता शान्तपणे बाळासाहेबांच्या हाती आली. याच शांतीच्या मार्गाने उद्या बाळासाहेबांच्या हातून समाजवाद्यांच्या हाती जावी. लोकशाहीत याला वाव आहे. वेळ लागेल; परंतु अवसर आहे. लोकशाहीत संघटनेचे, प्रचाराचे स्वातंत्र्य असते. मनुष्य आपल्या अंतःप्रेरणेस अनुसरून वागेल तर लोकशाही राज्यसंस्थेत अहिंसक क्रांतीस वाव आहे. म्हणून लोकशाही श्रेष्ठ आहे. परंतु लोकशाही अधिक यथार्थ व्हायला नैतिक बळ समाजांत वाढायला हवे. लोकशाहीचा पाया अहिंसेवर आधारलेला हवा. परंतु नैतिक बळ समाजांत वाढावे म्हणून, लोकशाहीचा अहिंसा पाया असावा म्हणून, समाजघटनेतच आपणांस शिरावे लागेल. ते कसे ते पुढे पाहू.

« PreviousChapter ListNext »