Bookstruck

महात्मा गांधींचें दर्शन 24

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

महात्मा  गांधींचे दर्शन
प्रकरण ४ थे

लोकशाही ही सत्य-अहिंसेच्या दृष्टीने का श्रेष्ठ याचे विवेचन काल आपण सुरू केले होते. महात्मा गांधींना सत्याग्रहाच्या मार्गाने जी क्रान्ति घडवून आणायची आहे, तिच्यासाठी लोकशाहीतील  आधारभूत हक्क आवश्यक आहेत. गांधीजींच्या सत्याग्रहांतील मूलभूत कल्पना अशी आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनोदेवतेच्या सांगीप्रमाणे, आज्ञेप्रमाणे बोलायचा हक्क आहे. या गोष्टीवर त्यांची लोकशाही आधारलेली आहे. एका व्यक्तीने सत्यशोधन करावे आणि सर्वांनी ते निमूटपणे मानावे ही गोष्ट गांधीजींस पसंत नाही, मान्य नाही. सत्य काय यासंबंधी सर्वांची मते निरनिराळी पडली तर ज्याने त्याने आपल्या मनोदेवतेच्या आज्ञेप्रमाणे वागले पाहिजे. असे करताना राज्यसंस्थेच्या कायद्यांचे उल्लंघन करणेहि प्राप्त होईल; परंतु ते केले पाहिजे. परमेश्वराचा आवाज दडपून ठेवता कामा नये. सद्सद्विवेकबुध्दीच्या आवाजाची गळचेपी होता कामा नये.

गोंधळाचा आक्षेप व त्यावर उपाय

परंतु जो तो स्वतःच्या बुध्दीप्रमाणे वागू लागला तर अनवस्थाप्रसंग ओढवणार नाही का? समाजांत सारा गोंधळच नाही का माजणार? बजबजपुरी, जो तो बुध्दीच सांगतो असे नाही का होणार? असा आक्षेप घेता येऊन नये म्हणून महात्मा गांधी तेथे अहिंसेचा आधार घेतात. अहिंसेचा आधार येथे अवश्य आहे. स्वतःच्या मनोवृत्तीप्रमाणे वागण्याचा, राज्यसंस्थेचे उल्लंघन करण्याचा हा हक्क तुम्हांला दिला; परंतु त्याचबरोबर समाजांतील हिंसावृत्ति नष्ट करण्याची जबाबदारीहि तुमच्यावर टाकलेली आहे. कायदेभंग हा सविनय आहे. सविनय कायदेभंगाचा हक्क जन्मसिध्द आहे. हें तत्त्व सनातन आहे, सर्वकालीन आहे. जोपर्यंत तुम्ही हिंसेला उत्तेजन देत नाही, तोंपर्यंत स्वमतप्रचार करा, कायदाहि मोडा. परंतु राज्यकारभारांत ढवळाढवळ माजवूं नका. गांधीजींना लोकशाहींत हें शक्य वाटतें. म्हणून त्यांना लोकशाहीचें आकर्षण वाटतें. लोकशाहीत मनाप्रमाणें विचार करण्याचा, आचार करण्याचा, प्रचार करण्याचा, अहिंसेची सार्वभौम मर्यादा सांभाळून हक्क आहे. परंतु सर्वंकष हुकुमशाहींत हें शक्य नसतें. तेथें राज्यसत्तेच्या विरुध्द कांही करतांच येत नाही. विरुध्द विचाराच्या लोकांना तेथें संघटनास्वातंत्र्य नसतें. प्रचार, प्रसार, कांहीहि करतां येत नाही. प्रस्थापित राजकीय पक्षाविरुध्द हुकुमशाहींत कांहीहि करायला अवकाशच नसतो. प्रस्थापित राज्यसंस्थेच्या विरुध्द जी विचारसरणी, तिला तेथें प्रभावी व्हायचें असेल तर शस्त्रबळाशिवाय तें शक्य नसतें. ट्रॉट्स्कीला मतप्रचारस्वातंत्र्य नव्हतें, म्हणून तो हिंसेच्या मार्गाकडे वळला. परंतु त्यालाच प्रबळ सत्तेनें हांकलून लावलें, हद्दपार केलें. परंतु या गोष्टी लोकशाहींत चालूं ठेवणें विसंगत दिसेल. लोकशाही घटनेंत सत्यसंशोधनास अधिक वाव आहे असें महात्माजींना वाटतें. म्हणून त्यांना ती पसंत आहे. लोकशाहींत वर वर तरी कां होईना सत्य, अहिंसा यांना स्थान आहे. मतप्रचाराचें स्वातंत्र्य असावे, असलें पाहिजे. आपला हा जन्मजात हक्क आहे.

« PreviousChapter ListNext »