Bookstruck

श्याम 105

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गंगू म्हणाली, 'माझ्या हाताला सवय आहे. हे बघ घट्टे पडले आहेत. तुझ्याने काढवणार नाही. तू माहेरी आलेली, तू कशाला पाणी काढतेस ? तुला सासरी आहेच काम. मी जातो. आपण उद्या खेळू हां !

गंगू कधी कधी मुन्सफांच्या मुलीकडे खेळावयास जावयाची. दिगंबराने तिथे तिची ओळख करुन दिली होती. मुन्सफांच्या बागेत पपनशीची झाडे होती. मुन्सफांच्या मुली पपनसे पाडीत व खूप खात. गंगूही अर्थात खाई; परंतु गंगू श्यामला घेऊन येई.

एके दिवशी पपनसच्या चार-पाच फोडी गंगूने आणल्या होत्या. मी तिला विचारले 'तुला कोणी दिल्या एवढया ?'

गंगू म्हणाली, 'मुन्सफांच्या मुलींनी.'

मी म्हटले, 'तू मागितल्या असशील म्हणून त्यांनी दिल्या.'

गंगू म्हणाली, 'होय. मी मागितल्या.'

मी म्हटले, 'असे दुस-याकडे मागू नये. तुझ्या पाठीमागे त्या मुली तुला नावे ठेवतील. गंगू हावरट आहे.'

गंगू म्हणाली, 'मला नाही हावरट म्हणणार ! परंतु तुला मात्र म्हणतील !'

मी रागाने म्हटले, 'माझं नाव त्यांना काय माहित ? आणि मी का हावरट आहे ?'

गंगू म्हणाली, 'मी त्यांना सांगितले की, आमच्याकडे श्याम नावाचा एक मुलगा आहे. त्याला पपनस फार आवडते; तर द्या.'

मी म्हटले, 'कोणी सांगितले तुला की मला पपनस आवडते म्हणून.'

गंगू म्हणाली, 'तुझ्या वडीलांनी. मागे आले होते तेव्हा सहज कशावरुन तरी ते म्हणाले. म्हणून आम्हाला कळले.'

मी म्हटले, 'मला पपनस आवडत असले तरी माझ्यासाठी भीक मागून आणायला नको काही. मला नको हे भिकेचे पपनस !'
गंगू म्हणाली, 'श्याम, मी का भीम मागितली ! अरे त्याच म्हणाल्या की घरी तुझ्या आईला घेऊन जा म्हणून.'

मी म्हटले, 'त्या एवढे म्हणाल्या असतील तर आणायच्या फारतर एक-दोन फोडी; परंतु इतक्या आणणे हे काही चांगले नाही. त्यांनी त्यांचा चांगुलपणा दाखविला; आपण आपला चांगुलपणा दाखवायला नको का ? एखादी दुसरी घ्यायची फोड व पुरे म्हणायचे.'

गंगू म्हणाली, 'मला नाही हो श्याम समजत. मी कोठे शाळेत गेले होते तुझ्यासारखी शहाणी   व्हायला ? मंगू आहे अडाणी, वेडी !'

गंगूला रडू आले व मलाही वाईट वाटले.

मी म्हटले, 'गंगूताई, तुला वाईट वाटले होय ? आण त्या फोडी, मी सा-या खाऊन टाकतो; म्हणजे तर बरे वाटेल ना ?'

गंगू म्हणाली, 'नको हो खायला ! भिकेच्या फोडी तू कशाला खाशील ?'

मी म्हटले, 'गंगू ! श्याम भिकारीच आहे. पुण्याला मामांकडून मी पळून गेलो होतो व मधुकरीच मागणार होतो. अजूनही वाटते की, येथून कोठे तरी दूर जावे व तेथे भिक्षा मागून शिकावे. येथे मधुकरी मागावयास मला लाज वाटते. लोक हसतील. आमचे नाव मोठे आहे ना ? परंतु दूर देशात मला कोण ओळखणार ? तुझा श्याम एक दिवस भिकारीच होणार आहे ! भिका-याच्या भाग्याने तो शोभणार आहे ! भिका-या सुदाम्यालाच देव भेटला. भिका-या श्यामलाही कधी भेटेल ! देवाला भेटू पाहणा-याला भिकारी व्हावे लागते; देशाची सेवा करण्याला भिकावी व्हावे लागते. फकीर व्हावे लागते; विद्येची उपासना  करणा-याला भिकारी व्हावे लागते.

« PreviousChapter ListNext »