Bookstruck

श्याम 106

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गंगू म्हणाली, 'पपनसांच्या फोडीसाठी भिकारी व्हावे लागते. गंगूही भिकारीच आहे.'

मी म्हटले, 'तू भिकारी व मी भिकारी. पपनसाच्या फोडी खाऊन आता श्रीमंत होऊ या.'

गंगू म्हणाली, 'तूच सा-या खा. त्या तुझ्या नावाच्या आहेत.'

मी म्हटले, 'माझ्या मालकीच्या फोडीतील एक मी तुला देतो. ही एक जगन्नाथाला देतो व ही मी खातो.'

गंगू म्हणाली, 'जगन्नाथाला कशाला ?'

मी म्हटले, 'का बरे ? सर्वांना द्यावे.'

गंगू म्हणाली, 'मग माझ्या फोडीतील आणखी अर्धी तू घे; हि घे.'

गंगूजवळची आणखी अर्धी फोड घेऊन मी गेलो.

एके दिवशी गंगूचे व माझे चांगलेच भांडण झाले. मी आवळीच्या झाडावर चढलो होतो. तिने मला दगड मारला. मी रागावलो.

मी म्हटले, 'का दगड मारलास ?'

गंगू म्हणाली, 'श्याम ! गमतीने मारला म्हणून काय झाले ?'

मी म्हटले, 'ही कसली गंमत ? लांडग्यावाघांची गंमत !'

गंगूने विचारले, 'मी का वाघ आणि लांडगा ?'

मी म्हटले, 'तुझी आई वाघ आणि तूही वाघ !'

गंगू रागावली व म्हणाली, 'श्याम ! एक वेळ मला म्हण वाघ; परंतु आईला म्हणशील तर बघ !'

मी म्हटले, 'मी खरे तेच सांगतो. एके दिवशी मागे पावसाळयात घरात सर्वत्र गळत होते. म्हणून   तुझी आई, जगन्नाथ व मी, सारी मरीच्या देवळात निजलो. तुझी आई तर केवढयाने घोरते ! रात्री तात्या ११  ।  १२ वाजताना बाहेरुन येत होते. आम्ही देवळात निजलो होतो, हे तात्यांना माहीत नव्हते. तात्यांना वाटले की, देवळात वाघच येऊन बसला आहे. तात्यांनी दोघांतिघांना बोलाविले. कंदील व काठया घेऊन बाजूला उभे राहून 'हुश् हुश् !' मोठयाने करु लागले. शेवटी मी जागा झालो. मी बाहेर आलो तो तेथे तात्या व काठया ! मी त्यांना सांगितले, 'दिगंबराची आई घोरते आहे.' सारा उलगडा झाला. सारे हसू लागले. विचार तुझ्या आईला मी खोटे सांगत असलो तर.'

गंगू म्हणाली, 'एखादे माणूस घोरत असले म्हणजे वाघ म्हणावे वाटत ! श्याम ! आई तुझ्यापेक्षा कितीतरी मोठी आहे. तू आपल्या आईला असे म्हणशील का रे ?'

मी म्हटले, 'पण मी रागात म्हटले, ते खरे असते वाचते ?'

गंगू म्हणाली, 'राग आला म्हणून काय झाले ? असे बोलणे शोभत नाही. अशा मुलांजवळ मी आजपासून बोलणारच नाही !'

असे म्हणून गंगू निघून गेली. मी रोज सकाळी फुले नेऊन द्यावयाचा. गंगूची आई फुले घेई; परंतु गंगू बोलत नसे. मी सायंकाळी गंगूकडे जाई; परंतु गंगू एका शब्दानेही बोलेना. मला फार वाईट वाटू लागले. असे काही दिवस गेले. एके दिवशी सायंकाळी शाळेतून खिन्न होऊन मी घरी आलो. त्या दिवशी मला फारच वाईट वाटत होते. मी गंगूच्या घरी गेलो नाही. मी माझी पिशवी ठेवून वर परसात गेलो. एका कलमी आंब्याला झाडाखाली मी बसलो होतो व आम्रवृक्षाच्या मुळांना डोळयातून पाणी घालत होतो.

« PreviousChapter ListNext »