Bookstruck

श्याम 128

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

काजूच्या कच्चा बिया काढून त्या दगडावर घासून त्यातील गर काडीने काढून खाण्यातही आम्ही तत्पर असू. हाताला त्या बीतील तेल लागू नये व बोटांना डाग पडू नयेत म्हणून आम्ही जपत असू. काजूची पाठीमागची फळेही मीठ लावून आम्ही ती पिकली म्हणजे आनंदाने खात असू. लाल काजूपेक्षा पिवळे काजू अधिक गोड असतात, वगैरे तात्पुरते शोधही लावीत असू.

पावसाळा आला म्हणजे सारे मेवे संपून जात. झाडावर चढणेही त्या दिवसात कठीण ! थोडेफार फणस पावसाळा सुरु झाला तरी झाडावर असत. आम्ही फणसासारखी मोठी फळेही काढीत असू. त्यात खुंटी मारुन कोठेतरी जाळीत लपवून ठेवीत असू. खुंटी मारुन ठेवला म्हणजे फणस लौकर पिकेल, असे आम्हास वाटत असे. त्या खुंटी मारलेल्या फणसास रोज मधल्या सुट्टीत जाऊन पिकला की नाही, हे आम्ही पाहात असू. परंतु शेवटी अधीर होऊन या अर्धवट मऊमऊ झालेल्या फणसाची आम्ही चिरफाड करीत असू व त्यातील ते गुळचट गरे पोटात भरीत असू.

पावसाळयातील मुख्य मेवा म्हणजे काकडया. अशा कोवळया कोवळया काकडया मी कोठेही खाल्ल्या नाहीत. आम्ही वर्गणी करीत असू. एकेक आणा वर्गणी. शाळेच्या खालच्या बाजूस गरीब कुणब्यांची घरे होती. तेथे काकडया विकत घ्यावयास आम्ही जात असू. एका दिडकीला तीन-चार काकडया मिळत. पिवळया गराच्या, लालसर गराच्या त्या लुसलुशीत काकडया आम्हांला आवडत म्हणून सांगू ? आम्ही पाच-सहा जण असू. ते पाच-सात आणे महिनाभर आम्हांला पुरत.

मधली सुट्टी भटकण्यात, खाण्यात आम्ही दवडीत असू. परंतु आमचे काव्यशास्त्र विनोदही त्या वेळेस चालत असे. निरनिराळे श्लोक शंकर जोशी घेऊन यावयाचा व ते श्लोकात्मक कूटप्रश्न आम्ही सोडवीत असू.

दिनकरतनयेचे नीर आणीत होत्ये
शशिधरवहनाने ताडिले मार्गपंथे
नदिपति रिपु ज्याचा तात भंगून गेला
रविसुत महिसंगे फार दु:खीत झाला  ।।

दिनकर-तनया म्हणजे यमुना. मी यमुनेचे पाणी आणीत होते. वाटेत शशिधर म्हणजे शंकर, त्याचे वाहन म्हणजे बैल- त्या बैलाने मारले. त्यामुळे समुद्राचा शत्रू जो अगस्ती त्या अगस्तीचा तात म्हणजे घट - तो घट फुटला आणि रविसुत म्हणजे कर्ण - कान पृथ्वीवर पडल्यामुळे फार दुखावला. असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे.

कोणे एक वनी सुलक्षण वधू मेघोदके जन्मली
बालत्वे नरनाम तीस असता स्त्रीनाम तै पावली
पाचानी प्रणिली तयातुन तिहीं अत्यादरे वन्दिली
तेथून श्रम पावली म्हणुनिया कर्णान्तरी राहिली

पावसाळयात रानात बोरु उगवतात व बोरुची झाली लेखणी. तो बोरु होता. त्याची ती लेखणी  झाली. पाची बोटांनी ती लेखणी धरिली; परंतु त्यातल्या त्यात तीन बोटांनी तिचे फारच स्वागत केले. आणि तीन बोटांना राहण्याचा जेव्हा कंटाळा येतो, तेव्हा ही लेखणी कानावर जाऊन बसते.

« PreviousChapter ListNext »