Bookstruck

श्याम 129

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कीर्तनास नर हो तुम्हि जा गा
कीर्तनास नर हो तुम्हि जागा
कीर्तनास नर हो तुम्हि जा गा
कीर्तनास नर हो तुम्हि जागा

या श्लोकात 'जागा' शब्दाचे निरनिराळे पदपाठ कसे करावयाचे, अर्थ कसे बसवावयाचे किंवा,

शंकरास पुजिले सुमनाने
शंकरास पुजिले सुमनाने
शंकरास पुजिले सुमनाने
शंकरास पुजिले सुमनाने

या श्लोकात सुमन शब्दाचे फूल, चांगले मन, गहू व सुमन नावाचा मनुष्य असे अर्थ कसे करावयाचे, हे आमचा मित्र शंकर आम्हांस सांगावयाचा.


मोरोतपंतांच्या आर्याही निघावयाच्या. वामनी श्लोक निघावयाचे. पंक्तीमध्ये निरनिराळे गमतीचे श्लोक कसे म्हणतात तेही आम्ही एकमेकांस सांगावयाचे. कधी कधी आम्ही शब्दांच्या किंवा कवितांच्या भेंडया लावावयाचे, अशा रीतीने ही मधली सुट्टी आम्ही दवडीत असू.

मधल्या सुट्टीत आटयापाटया वगैरे खेळही आमचा वर्ग खेळत असे.

केशव हा फार उत्कृष्ट खेळणारा होता. परंतु आम्ही फार दमून जात असू. म्हणून हा खेळ आम्ही पुढे बंद केला आणि स्वच्छंदपणे टोळयाटोळयांनी फिरत असू, गात असू. ते आनंदाचे, मोकळया वृत्तीचे दिवस केव्हाही आठवले तरी खूप मजा वाटते. शाळेच्या बंधनाभोवती हा आमचा मोक्ष आम्ही उभा केला होता.

बंधन काट मुरारी हमारे बंधन काट मुरारी

देवा, आमची बंधने तोड, अशी आमची प्रार्थना असे. तीन तासांच्या कोंडवाडयानंतर मिळणारा मधल्या सुट्टीत हा एक तासाचा वेळ आम्हांला किती उत्साहप्रद होत असेल बरे ? पहिल्या तीन तासांचा कंटाळा विसरुन पुढच्या तीन तासांना पुरेल इतका उत्साह व उल्हास या एका तासात आम्ही आमच्या जीवनात भरुन घेत असू. रामतीर्थ म्हणत असत की, 'कंटाळा आला म्हणजे घराबाहेर पहावे. उंच आकाश, विशाल क्षितिज, प्रचंड वृक्ष, यांच्या सान्निध्यात हिंडावे, फिरावे. त्यामुळे पुन्हा हुरुप व चैतन्य रोमरोमी संचारल्याशिवाय राहणार नाही.'

पृथ्वीचा हा बाह्य स्पर्श, पृथ्वीचा हा विशाल मुका स्पर्श अमृतदायी व जीवनदायी असतो. याची ज्याला शंका असेल त्याने स्वत:च त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला बरा !

« PreviousChapter ListNext »