Bookstruck

श्याम 130

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

२५.  श्याम व राम

आकाशातून पाऊस झिमझिम येतो व रखरखीत आणि भगभगीत वाटणा-या पृथ्वीच्या कणांकणांतून मधुन सुगंध बाहेर दरवळू लागता. 'गंधवती पृथ्वी' अशी पृथ्वीची व्याख्या केलेली आहे; परंतु पृथ्वीच्या अणुरेणूतून भरलेला हा सुगंध जर ओलावा न मिळाला तर आतल्या आत गुदमरुन जात असतो. आकाशातून देवाघरचा थोडासा ओलावा मिळताच पृथ्वीचे हृदय उचंबळून येते. पृथ्वीचे हृदय सद्गदीत होते. तिच्या रोमरोमांमधून सुगंधाच्या रुपाने कृतज्ञता चौफेर पसरते. ते दरिद्री, हीनदीन दिसणारे मातीचे कण दशदिशांना सांगतात, 'आम्ही भिकारी नाही. आम्ही मृत्कण असलो तरी तुच्छ नाही. आमच्यात सौंदर्य व सुवास ओतप्रोत भरलेला आहे. जगात कोणतीही वस्तू सौंदर्यशिवाय व सुगंधाशिवाय नाही. ती प्रकट व्हावी यासाठी ओलावा मिळाला पाहिजे. सहानुभूतीचा स्पर्श लाभला पाहिजे, मुरलीला तुमचे ओठ लागताच तिच्यातून संगीत स्त्रवू लागते. ध्रुवाच्या कोमल गालाला देवाच्या हातातील शंखाचा स्पर्श होताच त्यातून वेदश्रुती बाहेर नाचत आल्या. कोणासही तुच्छ मानू नका. जगाने आम्हाला पायांखाली तुडविले; परंतु पावसाचे चार थेंब येताच आमच्या अंगप्रत्यंगातून सुगंध बाहेर पडू लागला. हिरवे हिरवे सौंदर्य प्रकट होऊ लागले. अरे मानवा ! मातीचे कण म्हणजे सोन्याचे कण आहेत; प्रत्येक वस्तू सौंदर्यासागर परमात्म्याचाच अंश आहे.'

पाऊस पडू लागताच भूमातेच्या शरीरावर हिरवे रोमांच उभे राहतात. पाऊस पडू लागला म्हणजे श्यामचे हृदयही असेच नाचते. पावसात फिरावयास जावे व ओलेचिंब व्हावे, असे मला नेहमी वाटत असते. विजांचा चमचमाट होत असावा. मेघांचा गडगडाट होत असावा. मुसळधार पाऊस ओतत असावा. जोराचा वारा सुटून झाडे एकमेकांच्या अंगाखांद्यावर पडत असावीत. अशा वेळेस माझ्याच्याने घरी कधीही राहवत नाही. दिवस असेल तर लोक काय म्हणतील, या विचाराने मी मनाची कुचंबणा करीत घरी बसतो; परंतु जर रात्र असेल तर हा श्याम बाहेर पडावयाचाच व सृष्टीचा हा महान् अनंतधारा अभिषेक स्वत:च्या मस्तकावर नि:शंक होऊ द्यावयाचा. 'ईश्वराच्या कृपेत मी न्हाऊन माखून आलो.' असे तो म्हणावयाचा.

पाऊस म्हणजे प्रभूची कृपा, असे लहानपणापासून मला वाटते. 'श्याम ! असे वेळोवेळी पावसात भिजून येणे चांगले नाही. हे एखादे वेळेस बाधेल' असे जर कोणी मला म्हटले तर मी त्याला म्हणतो, 'आईच्या प्रेमाश्रूंनी न्हालेल्या मुलाला का थंडी पडसे येते ? त्या मुलाचे मुखकमल टवटवीत दिसेल. त्याला उत्साह व आनंद, प्रेम व कृतज्ञता यांचे भरते येईल. तसेच माझे. अरे, मी मागच्या जन्मी मोर असेन मोर. म्हणूनच जरा गडगडले, जरा मेघ जमले की, माझे हृदय थयथय नाचू लागते. हृदयातील शतभावनांचा भव्य दिव्य पिसारा उभारला जातो.'

लहानपणापासून मी प्रेमाचा भुकेलेला आहे. पावसाचा भुकलेला आहे. मी दापोलीस आत्याकडे शिकवण्याकडे राहिलो; परंतु पोटभर प्रेम तेथे मला कोठून मिळणार ? तेथे मला पोटभर जेवण मिळे. परंतु मनुष्य केवळ भाकरीचा भुकेलेला नाही. त्याला भावबंधन पाहिजे असते. म्हणून मी आत्याकडून शनिवार, रविवार घरी जाऊन यावयाचा. आईचे प्रेमामृत पिऊन यावयाचा. तिचा मुखचंद्रमा पाहून यावयाचा. परंतु आई आठवडयातून, महिन्यातून भेटणार मला. रोज प्रेमाची धार कोण देणार ?

« PreviousChapter ListNext »