Bookstruck

राम-रहीम 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

राम : काही हिंदू म्हणतात हिंदुस्थान हिंदूंचा.

रहीम : इतर मुसलमान राष्ट्रांतील बंधू आम्हांस हसतात. आमची ही भांडणे ऐकून तो थोर केमालपाशा आमचा तिरस्कार करी. तुर्कस्तानात मशिदीवरून बँड वाजत जातात. परंतु येथे आम्ही हा चावटपणा मांडला आहे.

राम : आमच्यातील काहींना मशीद आली, की अधिक जोराने ओरडण्याची व अधिक जोराने वाजविण्याची कधी कधी स्फूर्ती येते.

रहीम : माझे वडील मुस्लिम लीगवाले आहेत. ते मला मुस्लिम लीगच्या स्वयंसेवकांत जा सांगतात. मला ते करवत नाही. पेशावर प्रांतात तर तीस सालच्या चळवळीत शेकडो मुसलमान मोटारखाली चिरडले गेले. पंधरा हजार पेशावरी पठाण तुरूंगात गेले. मी ते करणार. काँग्रेस राष्ट्र निर्मीत आहे.

राम : मुस्लिम लीग व हिंदुमहासभा या नबाबांच्या आहेत. गरिबांसाठी त्यांचा कार्यक्रम नाही. शेतकरी-कामकरी यांच्याविषयी त्यांना आस्था नाही. जगात खरे भेद हिंदु-मुसलमान असे नसून पिळले जाणारे व पिळणारे असे दोनच भेद. गीतेत हेच दोन भेद सांगितले आहेत.

रहीम : कानपूरला हिंदु-मुसलमान कामगार एक आहेत. त्यांचे ऐक्य मोडावे म्हणून तेथे सारखे हिंदू-मुस्लिम दंगे मुद्दाम पेटविण्यात येतात. परंतु कामगार अलग राहतात. परवा बारीसालचे हिंदू-मुस्लिम किसान मिरवणूक काढीत आले. मुस्लिम लीगवाल्यांनी मुसलमान शेतक-यांस फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु हिंदू-मुसलमान शेतकरी गर्जना करून म्हणाले, ''आम्हांला ही धर्मांची सोंगे माहीत आहेत.'' हिंदू जमीनदार, मुसलमान जमीनदार एक होतात व गरीब हिंदू-मुसलमांनास छळतात.

राम : तिकडे कोकणात हिंदुमहासभेचे अभिमानी खोत खोतसंघात शिरतात. त्या संघातही मुसलमान असतात. त्या वेळेस त्यांचा अभिमान कोठे जातो ?

रहीम : सर्वांना पैशाचा अभिमान आहे. पैसेवाले एकमेकांचे भाऊ. गरीब गरीबांचे भाऊ.

राम : रहीम, माझे वडील तर मला जसे मारायला उठतात !

रहीम : माझी तीच स्थिती.

दोघा मित्रांनी हात हातात घेतले. सायंकाळ होत आली. हिंदु-मुस्लिम ऐक्याचा नमाज ते पढत होते. हिंदू-मुस्लिम ऐक्याची संध्या ते म्हणत होते.

« PreviousChapter ListNext »