Bookstruck

चिटुकल्या गोष्टी 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

बापूजींचा चुटका :
''आधी एक बापूजींचा चुटका सांगा.''
''बारा भागांतून ते सारे येणारच आहे.''
''ते येईल तेव्हा येईल. आता सांगा.''

''सांगतो ऐका. एकदा बापूजी सायंकाळचा आहार घेत होते. कोणी द्राक्षे आणून दिली होती. बापूजी पाच पदार्थांहून अधिक एका वेळी घेत नसत. ते फळे खात होते. त्याच वेळेस त्यांच्या भेटीस कोणी कुटुंब आले. आईबाप, लहान मुलगा अशी मंडळी होती. प्रणाम करून सारी बसली.'' लहान मुलगा आईला म्हणाला,

''गांधीजी वेडे आहेत.''
''अरे असे बोलू नये.''
''होय. वेडेच आहेत गांधीजी. अगदी वेडे.''
''चूप.''
गांधीजींचे लक्ष गेले. ते हंसून म्हणाले, ''काय म्हणतो आहे लबाड? काय रे?''
''तुम्ही वेडे आहात.''
''मी वेडा? का रे?''
''तुम्ही एकटे एकटे खाता. आई मला मागे म्हणाली एकटयाने खाणे वेडेपणा. तुम्ही तर एकटे खाता.''

गांधीजींना हसूं आवरेना. सर्वांना हसू आले.

''बरे, माझ्याबरोबर तूं ये खायला. ही घे फळे. ये.''
''मला नको.''
''कां?''

''आई पुन्हा रागावेल. दुस-याने दिले तरी हाव-यासारखे घेऊ नये असे ती सांगते. मला घरी रागावेल, हावरट म्हणेल.''

''परंतु तूं एकदम नको घेऊस. मी आग्रह करतो. म्हणजे नाही हावरट होणार. तूही मग शहाणा आणि मीही. खरे ना?''

असा हा चुटका. छान आहे ना?

« PreviousChapter ListNext »