Bookstruck

फुलाफुलांचा गंध वाहता वार...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

फुलाफुलांचा गंध वाहता वारा

तुमच्या ओठी सूर होउनी आला

तुम्ही पाहिले निळेभोर आकाश

तुम्ही पाहिला निर्मळ नितळ प्रकाश

कधी न ज्याला मरण, जरा कधी नाही

ते देवांचे काव्य जिवंत प्रवाही

तुम्ही थरारुन मिटता लोचन ध्यानी

ये कमळापरि फुलुन सहस्‍त्र दलांनी

काशफुलांच्या शुभ्र शुभ्र लाटांत

हळव्या हिरव्या दिशामुक्‍त वाटांत

वीज माळल्या उत्कत श्याम घनात

अन् शरदाच्या सोनफुलोर मनात

कधी झराझर झरणार्‍या धारांत

कधी झळाळत किरणांच्या तारांत

लाडिक अवखळ चालीतून झर्‍यांच्या

दंवात भिजल्या डोळ्यांतून पर्‍यांच्या

तुम्ही ऐकिली दिव्य पुरातन एक

सौंदर्याची ती चिरनूतन हाक

कसे अकारण झाले कंपित प्राण ?

आनंदाचे गीत म्हणाले कोण ?

या मातीवर, फुलांफुलांवर इथल्या

मेघांवर अन् जलधारांवर इथल्या

हृदय ओतुनी केली कोणी प्रीत ?
जय रवींद्र हे, जयजय शाश्‍वत गीत

संन्यासाची फेकुनि भगवी कफनी

कुणी चुंबिली बेहोषुनि ही धरणी ?

कुणी पाहिला ईश्‍वर आनंदात ?

जय रवींद्र हे, जयजय शाश्‍वत गीत

दूर तिथे त्या धगधगत्या शेतात

खपतो हलधर निथळुनिया घामात

कोणी केला प्रणाम त्या श्रमिकाला

आणि म्हणाला फेकुनि दया जपमाला ?

रंगगंधरससौंदर्याचा जय हो

फुलणार्‍या प्रत्येक फुलाचा जय हो

तुमचे जीवन अमरण साक्षात्कार

आनंदाचा चिरंजीव उद्‌गार !

« PreviousChapter ListNext »