Bookstruck

धर्म 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
अधिचित्तशिक्षा किंवा सामाधि.

अधिशीलशिक्षा सांपदिल्यावर अधिचित्तशिक्षा संपादण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शीलसपंत्ति संपादन केल्यावांचून समाधिलाभ व्हावयाचा नाहीं. भगवान् बुद्धानें ह्मटलें आहें:-

“आकंखेय्य चे भिक्खवे भिक्सु चतुन्नं झानानं अभिचेतसिकानं दिट्ठधम्मसुखविहारानं निकामलाभी अस्सं; अकिच्छलाभी अकसिरलाभीति। सीलेखेवस्स परिपूरकारी।”
(आकंखेय्यसुत्त मज्झिमनिकाय)

भिक्षू हो, जर एकाद्या भिक्षूची प्रत्य़क्ष सुख प्रप्त करून देणार्‍या चारीहि ध्यानांचा यथेच्छ लाभ व्हावा, सहज लाभ व्हावा, वाटेल तेव्हां लाभा व्हावा, अशी इच्छा असेल तर त्यानें शीलाचें उत्तम रीतीनें पालन केलें पाहिजे.”

समाधि ह्मणजे चित्ताची एकाग्रता. तिचे अकुशल समाधि आणि कुशल समाधि असे दोन भेद आहेत. एकाद्या नाटकगृहांत नाटक चाललें असतां तेथील कांही श्रोते श्रृंगारपरिप्लुत पद्य ऐकून तल्लीन होऊन जातात. त्या प्रसंगीं त्यांच्या चित्ताची जी एकाग्रता ती अकुशल समाधि होय. त्याचप्रमाणें दुसर्‍याच्या घातपातांत एकादा मनुष्य गढून गेला असतां त्याच्या चित्ताची तावत्कालिक एकाग्रता अकुशल समाधींत गणिली जाते. ह्या अकुशल समाधीचा अर्थातच अधिचित्तशिक्षेंत समावेश होत नाहीं. केवळ कुशल समाधीलाच अधिचित्त शिक्षा ह्मणतात.

कुशल समाधीचे उपचार समाधि आणि अर्पणा समाधि असे दोन भेद आहेत. उपचार समाधि अल्पकाळ टिकणारी असते. लहान मूल उभें राहण्यास शिकत असतां फार वेळ उभें राहूं शकत नाहीं, त्याचप्रमाणें योग्याला आरंभींच साध्य होणारी उपचार समाधि फार वेळ टिकत नाहीं. अर्पणा समाधि उपचार समाधि साधल्यावर प्राप्त होते. ती अभ्यासानें पाहीजे तितकी टिकूं शकते. तिचे ध्यानभेदानें चार भेद होतात. वितर्क विचार, प्रीति, सुख आणि एकाग्रता, हीं प्रथम ध्यानाचीं पांच अंगें. द्वितीय ध्यानांत वितर्क आणि विचार राहत नाहीं, बाकी तीन अंगे राहतात. तृतीय ध्यानांत प्रीति राहत नाही; सुख आणि एकाग्रता हीं दोन अंगे राहतात. चतुर्थ ध्यानांत एकाग्रता आणि स्मृति (जागृति) अशीं दोनच अंगें असतात. इतर ध्यानांतहि स्मृति असते; परंतु चतुर्थ ध्यानांत तीं स्पष्ट होते; ह्मणून चतुर्थ ध्यानाची ती अंगभूत गणिली गेली आहे.

कुशल  समाधि चाळीस पदार्थाचें चिंतन करून साधितां येते. त्या पदार्थांस कर्मस्थानें असें ह्मणतात. त्या सगळ्याचें सविस्तर वर्णन करूं लागलें तर एक मोठा थोरला ग्रंथच होणार आहे. ह्मणून यांपैकीं उदाहरणादाखल चारांचेंच दिगदर्शन करितों.
« PreviousChapter ListNext »