Bookstruck

धर्म 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१ कायगता स्मृति.

विशुद्धिमार्ग ग्रंथामध्यें सर्व साधारणपणें मनुष्यांचे सहा भेद सांगितले आहेत. त्यांत रागचरित, द्वेषचरित आणि मोहचरित हे तीन मुख्य आहेत. ज्याची कामवासना इतर मनोवृत्तींहून बळकट तो रागचरित, ज्याचा द्वेष बलकट तो द्वेषचरित; व ज्याचा मोह ह्मणजे आळस बळकट तो मोहचरित, असें समजावें.

रागचरिताला कायगतास्मृति हें कर्मस्थान योगारंभीं विहित आहे. कायगतास्मृति ह्मणजे विवेकानें आपल्या शऱीराचें अवलोकन करणें. ज्याला कायगतास्मृति अभ्यास करावयाचा असेल त्यानें शरीरांतील निरनिराळ्या पदार्थांकडे वैराग्यपूर्ण दृष्टीनें पाहण्याची संवय करून घ्यावी. केश, नख, चर्म इत्यादि बाह्या पदार्थ पाहून जर वैराग्य उत्पन्न होत नसेल तर मांस, आंतडें, अस्थि इत्यादि आभ्यंतर पदार्थांकडे ज्ञानदृष्टीनें पहावें. जेथें फाडलेलें प्रेत पाहण्यास सांपडेल तेथें जाऊन तें अवश्य पहावें; व त्यांतील ज्या भागाकडे पाहून विशेष वैराग्य उत्पन्न होईल, त्या भागाची आपल्या शरीराच्या  भागाशीं तुलना करावी. किंबहुना तोच आपल्या शरीराचा भाग आहे अशीं कल्पना करावी. यासंबंधीं शांतिदेवाचार्य ह्मणतात:-

कायभूमिं निजां गत्वा कंकालैरपरै: सह।
स्वकायं तुलयिष्यामि कदा शतनधर्मीणम्।।


या देहाच्या हक्काच्या भूमींत (श्मशानभूमींत) जाऊन मृत मनुष्यांचे हाडांचे सांगाडे पाहून, कुजून जाणार्‍या ह्या देहाची त्या सांगाड्यांबरोबर मी कधीं तुलना करीन?

अयमेव हि कायो मे एवं पूतिर्भविष्यति।
श्रृगाला अपि यद्रंधान्नोपसर्पेयुरन्तिकम्।।

हें(हल्लीं चांगलें दिसणारें) माझें शरीर ह्या श्मशानांतील प्रेतांप्रमाणें इतकें कुजणार आहे कीं, त्याच्या दुर्गंधीला त्रासून कोल्हे देखील त्याजवळ येणार नाहींत।

अस्यैकस्यापि कायस्य सहजा अस्थिखंजका:।
पृथक् पृथग्गमिष्यन्ति किमुतान्य:प्रियो जन:।।


ह्या माझ्या एका देहाचीं एकत्र असलेलीं हाडें (या श्मशानांतील हाडांप्रमाणें) निरनिराळीं होऊन पडणार आहेत। मग प्रियबांधव मला सोडून जातील यांत आश्चर्य कसलें?(कारण ते माझ्यापासून सर्वदा निराळेच आहेत.)

अशारीतीनें शरीरांतील एकाद्या भागाचें वैराग्यपूर्ण विचारानें चिरकाळ चिंतन केलें असतां पुरूषाला सुंदर स्त्रीकडे आणि स्त्रीला सुंदर पुरूषाकडे पाहून सहसा कामविकार उत्पन्न होत नाहीं. भागश: शरीराकडे पाहण्याची संवय झाल्यामुळें तो मनुष्य बाह्य कांतीला पाहून पाहून एकदम भुलत नाहीं. त्या त्या अमंगळ शरीरभागांची त्याला आठवण होते, व ते त्या सुंदर कांतीच्या आड दडून बसलेले त्याला स्पष्टपणें दिसते असतात. ह्याविषयीं विशुद्धिमार्गंत एक गोष्ट आहे, ती येथें सांगितल्यावांचून माझ्यानें राहवत नाहीं.
« PreviousChapter ListNext »