Bookstruck

धर्म 10

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
प्राचीनकाळीं सिंहलद्वीपामध्यें अनुराधपूर नांवाचें एक शहर होतें त्याच्या आसपास पुष्कळ विहार असत. बुद्धघोषाचार्यंनीं विशुद्धिमार्ग व इतर ग्रंथ ह्या विहारांपैकीं महाविहार नांवाच्या विहारांत राहत असतां लिहिले. महाविहारादिक जुन्या इमारतींचे अवशेष अद्यापि पाहण्यास सांपडतात. ह्या शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका टेंकडीस चैत्यपर्वत ह्मणत असत. तेथें एक महातिष्य नांवाचा भिक्षु राहत असे. तो एके दिवशीं भिक्षाटनासाठीं अनुराधपुरास जात होता. त्याच वाटेनें आपल्या नवर्‍याशीं भांडून माहेरीं जाण्याकरितां एक स्त्री येत होती. त्या भिक्षूला पाहून त्याला भुलविण्यासाठीं ती मोठ्यानें हसली. त्यानें एकदम डोकें वर करून त्या स्त्रीकडे पाहिलें, तोंच त्याला तिचे दांत दिसले, व त्यांनीं त्याला त्याच्या नित्य चिंतनाचा विषय जो हाडांचा सांगाडा त्याची आठवण दिली. त्यामुळें त्या स्त्रीच्या अंगकांतीकडे त्यांचें लक्ष न जातां मूर्तिमंत हाडांचा सांगाडाच डोळ्यासमोर उभा आहे कीं काय असा त्यास भास झाला. तो तसाच पुढें चालता झाला. त्या स्त्रीच्या मागोमाग तिचा पति येत होता. तो ह्माला पाहून ह्मणाला:-“महाशय, ह्या मार्गानें गेलेली अलंकृत अशी सुंदर तरूण स्त्री आपण पाहिलीत काय ?” तेव्हां भिक्षू ह्मणाला:-

नाभिजानामि इत्थी वा पुरिसो वा इतो गतो।
अपिच अट्ठिसंघाटो गच्छतेस महापथे।।



“येथून स्त्री गेली किंवा पुरूष गेला हें कांही मला ठाऊक नाहीं. तथापि ह्या मोठ्या रस्त्यानें एक हडांचा सांगाडा जात आहे खऱा।”

ह्या कर्मस्थानानें कामविकार नष्टप्राय होतो, व योग्याला प्रथमध्यानापर्यंत मजल मारतां येतें. तदनंतर दुसर्‍या कर्मस्थानाच्यायोगें इतर ध्यानेंहि संपादितां येतात.
« PreviousChapter ListNext »