Bookstruck

कोल्हा व कोंबडा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एक कोंबडा एका कुंपणावर बसून मोठ्याने ओरडत असता त्याचा आवाज ऐकून भक्ष्याच्या शोधात असलेला एक कोल्हा त्या ठिकाणी आला. त्याला पाहाताच तो कोंबडा उंचावर जाऊन बसल्यामुळे आपल्या हाती लागेल असं त्याला वाटेना. मग त्याला काहीतरी थाप मारून खाली आणावे, या हेतूने तो त्याला म्हणाला, 'मित्रा तुला पाहून मला फार आनंद झाला. पण तू आहेस तिथून तुला मला आलिंगन देता येत नाही,यामुळे मला थोडसं वाईट वाटतं. तेव्हा तू जर स्वतः खाली येशील तर बरं होईल.' त्यावर कोंबडा वरूनच म्हणाला, ' कोल्होबा, मी जर खाली आलो, तर संकटात पडेन, तू माझा मित्र असल्याने तुझ्यापासून मला धोका नाही, तरी मी दुसर्‍या एखाद्या प्राण्याच्या हाती सापडलो तर माझी काय अवस्था होईल बरे ?' त्यावर कोल्हा म्हणाला, 'अरे मित्रा, तसली भीती बाळगण्याचं तुला काही कारण नाही. कारण प्राणी नि पक्षी यात नुकताच तह झाला असून यापुढे कोणी कोणाला त्रास देऊ नये असं ठरलं आहे. जो कोणी ह्या ठरावाविरुद्ध वागेल त्या शिक्षा करण्यात यावी असाही ठराव झाला आहे. ही तहाची गोष्ट सर्वांना कळली आहे तरी तुला अजून कशी समजली नाही याचं मला मोठं नवल वाटतं.' कोल्ह्याचे हे बोलणे चालू असता कोंबडा वर मान करून दूर पाहू लागला. तेव्हा कोल्हा त्याला विचारू लागला, 'मित्रा, इतकी उंच मान करून काय पाहतो आहेस ?' त्यावर 'समोरून पाच-सहा शिकारी कुत्रे येत आहेत, असं मला वाटतं, ' असे कोंबडा म्हणाला. ते ऐकताच कोल्हा म्हणाला, 'अरे, असं असेल तर मला गेलंच पाहिजे, रामराम ! हा मी निघालोच.' कोंबडा त्याला थांबवत म्हणाला, 'अरे भाऊ, तू असा पळू नकोस, मी लवकरच खाली येतो. तू जी तहाची गोष्ट सांगितलीस ती जर खरी असेल तर ह्या कुत्र्यापासून भीती बाळगण्याचं तुला काहीच कारण नाही.' त्यावर कोल्हा म्हणाला, 'नाही रे बाबा, तसं नाही. तह झाला आहे हे जरी खरं, तरी तो कुत्र्यांना अजून कळला असेल की नाही कोण जाणे !'

तात्पर्य

- ठकाला महाठक कधीतरी भेटतोच !

« PreviousChapter ListNext »