Bookstruck

दुर्दैवी 23

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''तुमचेही सुंदर नाव आहे.''
पुन्हा दोघे गप्प बसले.
''मी तुम्हांला अहो-जाहो करू, की एकेरी नावाने हाक मारू?''
''इच्छेप्रमाणे करा.''
''काय रे हेमंत, अशीच तुम्हांला मी हाक मारीन. तुम्ही मला जवळचे वाटता.''
''परंतु पुन्हा 'तुम्ही' असेच म्हणत आहात!''
''हेमंत, तू या घरातच राहा. निराळा नको राहू. माझ्याबरोबर जेवत जा. परकेपणा नको. तू काही नोकर म्हणून नाहीस; माझाच जणू तो भाग. आयुष्यातील, जीवनातील, व्यापारातील देवाने दिलेला भागीदार.''

''कामाशिवाय मला करमत नाही. काम कोणते करू?''

''माझ्या व्यापाराचे; तुमची कचेरी दाखवतो. तेथे काम करा. भरपूर काम आहे. काम करून दमाल, घामाघूम व्हाल. धान्याच्या बाजारात जावे लागते. गाडयांची रांग असते. धान्य मोजून घ्यायचे. पैसे चुकवायचे. धान्य साठवून ठेवायचे. हजारो कामे असतात.''

इतक्यांत एका नोकराने चहा आणून ठेवला. ब्रेडही होती. बिस्किटे होती.

''घ्या चहा. तुमच्याबरोबर आज पहिला चहा.'' हेमंत म्हणाला.

''हेमंत, आपला स्नेहसंबंध कायम राहो.''

चहा वगैरे घेऊन दोघे कचेरीकडे वळले. रंगरावांनी हेमंतला कचेरी दाखविली. नोकरचाकर होते.

''मी आजपासूनच काम करू लागतो.'' हेमंत म्हणाला.

''जशी तुझी इच्छा. तुझी इच्छा ती माझी. तुझ्याविरुध्द मी नाही. बस या कचेरीत. मी जाऊ? मला दुसरे काम आहे. जाऊ का, हेमंत?''

''जा. मी काही आता पळून जाणार नाही. अशा निरपेक्ष प्रेमाचे बंधन कोण तोडणार? माझ्यामध्ये तरी ती शक्ती नाही. जा तुम्ही. परंतु मी तुम्हांला कोणती हाक मारू?''

''रंगराव हीच हाक मारा.''

« PreviousChapter ListNext »