असे असूनही काही लोक समजतात की हिंदी विचार व संस्कृती जर कोणत्या तत्त्वाची प्रतिनिधी असतील तर ती संसार निवृत्तीची प्रतिनिधी आहे.  संसार प्रवृत्तीची नाही. माझी तर समजूत आहे की, सगळ्याच प्राचीन धर्मांत व संस्कृतींत काही तत्त्वज्ञानसंप्रदाय निवृत्तीला प्राधान्य देणारे असले तरी एकंदरीत पाहिले असता या संस्कृतीने संसारनिवृत्तीवर अधिक भर कधीच दिला नव्हता, व जो काही असेल तो ख्रिश्चन धर्मापेक्षा तर फारच कमी.  बौध्द धर्म आणि जैन धर्म यांनी जीवननिवृत्तीवर जास्त अधिक जोर दिला होता हे खरे, आणि हिंदी इतिहासाच्या काही कालखंडातही संसार सोडून पळून जाण्याची ही लाट मोठ्या प्रमाणावर आलेली दिसते.  उदाहरणार्थ, बुध्द विहारांत—बुध्द मठांत एकेकाळी हजारो लोक जाऊन भिक्षू बनत होते असे दिसते.  असे मधूनमधून का होई त्याचे कारण मला माहीत नाही.  युरोपात मध्ययुगीन काळात, जगाचा अंत जवळ आला आहे अशी समजूत प्रचलित होती, तेव्हा अशा प्रकारची किंवा याहून जास्त सूचक उदाहरणे दिसून येतात.  राजकीय किंवा आर्थिक परिस्थितीमुळे लोकांत नैराश्यवाद पसरून त्यामुळे ह्या संसारत्यागाच्या व निवृत्तिमार्गाच्या कल्पना निघाल्या असाव्या किंवा त्याला महत्त्व आले असावे.

बौध्द धर्माचे जीवनाकडे पाहण्याचे सिध्दान्त वैचारिक दृष्ट्या व तात्विक दृष्ट्या काहीही असले तरी त्यात तत्त्वाचा अतिरेक टाळला आहे.  बौध्द धर्म म्हणजे सुवर्णमध्य, बौध्द धर्म म्हणजे 'मध्यममार्ग.' त्या धर्मातील निर्वाणाच्या कल्पनेतसुध्दा (काही वेळा तिचा अर्थ करण्यात येतो त्याप्रमाणे) ती अवस्था म्हणजे सर्वस्वभाव शून्यावस्था अशी मुळीच नसून त्या अवस्थेतसुध्दा अस्तित्व, एकभावात्मक स्थिती आहेच.  परंतु ही कल्पना मानवी बुध्दीच्या आवाक्याबाहेरची असल्यामुळे तिचे वर्णन अभावार्थी करण्यात आले आहे.  हिंदी संस्कृती व विचार यांचेच एक विशिष्ट फळ म्हणजे बौध्द धर्म.  हा बौध्द धर्म जर केवळ निवृत्ती असता, शून्यवादी असता तर जे कोट्यवधी लोक त्यांचे अनुयायी आहेत त्यांच्यावर तसा काही परिणाम दिसून आला असता.  परंतु तसे काही न दिसता त्याच्या उलट प्रचार बौध्द धर्मीय देशांत दिसून येतो.  संसारप्रवृत्ती म्हणजे काय याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे चीनचे लोक आहेत.

हिंदी विचारवंत नेहमी जीवनाच्या अंतिम हेतूवर जोर देत असल्यामुळे हा असला सावळागोंधळ झाला आहे.  विश्वाच्या जीवनाच्या उभारणीत ह्या व्यक्त जगाच्या पलीकडचे काही अंतिम अव्यक्त आहे हे ते विचारवंत कधीही विसरू शकले नाहीत.  आणि म्हणून जगाचा, संसाराचा पुरस्कार करतानासुध्दा, संसाराच्या आहारी जाऊन त्याचे दास होण्याचे त्यांनी नाकारले.  तुमची सारी शक्ती, व उत्साह खर्च करून सत्कर्मे आनंदाने खुशाल करा, पण त्यात गुरफटून जाऊ नका, व त्याचा परिणाम काय होईल याची चिंता करीत बसू नका असा त्यांचा आदेश आहे.  अशा तर्‍हेने त्यांनी जीवन जगून कर्म करताना अनासक्त कसे राहावे ते शिकविले, जीवनपराङ्मुख व्हा, कर्मे सोडा असे सांगितले नाही.

ही अनासक्ततेची कल्पना हिंदी तत्त्वज्ञानातच आहे असे नाही.  इतरही तत्त्वज्ञानांतून हा विचार आढळतो.  दृश्य व अदृश्य जगात एक प्रकारचा समतोलपणा ठेवा, दोघांमध्ये एक प्रकारचा मेळ निर्माण करा हेच सांगण्याचा दुसरा मार्ग म्हणजे अनासक्त राहून वागा.  नाही तर या बाह्य जगाच्या, इहलोकाच्या खटपटीत भलतीच आसक्ती लागून अव्यक्ताची आठवण नाहीशी होते व ते हळूहळू दूर जाऊन दृष्टीआड पडते, व मग ही सारी खटपट जगाच्या अंतिम हेतूच्या दृष्टीने ध्येयशून्य, हेतूशून्य होऊन बसते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel