प्राचीन हिंदुस्थानातील जीवन आणि उद्योगधंदे

प्राचीन हिंदुस्थानातील तात्त्विक आणि आध्यात्मिक विचारांची कसकशी वाढ होत गेली यासंबंधी अनेक विद्वानांनी आणि तत्त्वज्ञान्यांनी संशोधनपूर्वक बरेचसे लिहिले आहे.  ऐतिहासिक कार्यक्रम ठरवून त्या काळांत राजकीय नकाशे स्थूलमानाने तयार करण्याचेही पुष्कळ प्रयत्न झाले आहेत.  परंतु त्या काळात लोकांची सामाजिक व आर्थिक स्थिती कशी होती; त्यांचे जीवन कसे होते, ते कसे राहात व काय करीत, त्यांनी काय काय कसे कसे निर्माण केले; व्यापार कसा चाले, इत्यादी गोष्टींविषयी फारसे संशोधन झाले नाही.  अलीकडे या महत्त्वाच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष देण्यात येऊ लागले आहे.  हिंदी विद्वानांनी या दृष्टीने काही ग्रंथ लिहिले आहेत.  एका अमेरिकनानेही एक ग्रंथ या विषयावर लिहिला आहे, परंतु करण्यासारखे अद्याप पुष्कळच आहे.  महाभारत तर समाजशास्त्रविषयक आणि तद्‍नुषंगिक अन्य गोष्टींसंबंधी माहितीचे भांडारच आहे.  इतर पुष्कळ ग्रंथांतूनही उपयुक्त माहिती मिळेल.  परंतु या विशिष्ट दृष्टीने त्यांची चिकित्सक पाहणी केली पाहिजे.  ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकातील कौटिल्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ याबाबतीत केवळ अमोल आहे.  मौर्य साम्राज्यात आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि लष्करी संघटना कशी होती ते या ग्रंथात सविस्तर दिलेले आहे.

बुध्दपूर्व काळातील हिंदी जीवनाची वर्णने जातककथांमध्ये आहेत.  या जातकांचे आजचे स्वरूप बुध्दनिधनोत्तर काळातले आहे.  बुध्दाच्या पूर्वजन्माच्या कथा या जातकांत आहेत अशी समजूत असल्यामुळे बौध्दधर्मीय वाङ्मयाचा तो महत्त्वाचा भाग बनला आहे.  परंतु यातील गोष्टी बर्‍याच पुरातन असाव्यात; आणि त्यामुळे बुध्द-पूर्वकालीन हिंदी जीवनाची महत्त्वाची माहिती त्यांच्यात आपणांस मिळते.  प्रोफेसर र्‍हिस डेव्हिड्स म्हणतो, ''लोककथांत सगळ्यांत अत्यंत महत्त्वाचे अतिप्राचीन, सर्वसंपूर्ण, असे हे संग्रह आहेत.''  पुढे ज्या पशुपक्ष्यांच्या अनेक कथा पंचतंत्र-हितोपदेशातून दिसतात; ज्या पुढे आशियाभर आणि युरोपभर पसरल्या त्यांचे मूळ या जातककथांतच आहे.

आर्य आणि द्रवीड या दोन प्रमुख मानववंशांचे भारतात शेवटी एकीकरण झाले त्या सुमाराचे हे जातकग्रंथ असावेत.  ''जातकावरून त्या वेळचा हिंदी समाज असा दिसतो की ज्याचे नीट वर्गीकरण करणे अशक्य आहे.''  किती विविध प्रकार आणि विविध रूपे, त्या काळातील परिस्थितीचे अव्यवस्थित स्वरूप आहे.  ज्याला आपण जातिसंघटना म्हणतो ती तर कोठे दिसतच नाही.

धर्मगुरुंची ब्राह्मणपरंपरा आणि राज्यकर्त्यांची क्षत्रियपरंपरा याशिवाय उरलेली जी बहुजनसमाजाची परंपरा तिचे चित्र या जातकांतून आहे असे म्हटले तरी चालेल. *

-----------------------

* रिचर्ड फिक्, ''बुध्दकालीन ईशान्य हिंदुस्थानातील सामाजिक संघटना (कलकत्ता : १९२०) पृष्ठ २८६ : या विषयावरील अलीकडचे पुस्तक-विशेषत: जातककथांवर आधारलेले असे रतिलाल मेहता यांचे 'बुध्दपूर्व हिंदुस्थान' हे आहे.  (मुंबई १९३९) येथील मी मांडलेल्या बर्‍याचशा गोष्टी या पुस्तकावरून घेतल्या आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel