ख्रिस्तपूर्व सातव्या शतकात कपिल महामुनी होऊन गेले.  ते सांख्यशास्त्राचे प्रणेते असे मानण्यात येते.  बुध्दपूर्वकालीन नाना विचारधारांतून सांख्यशास्त्र जन्माला आले.  रिर्चड गोर्बे म्हणतो, ''जगाच्या इतिहासात कपिल मुनींच्या सिध्दान्तात प्रथमच मानवी मनोबुध्दीचे स्वातंत्र्य आणि स्वावलंबित्व पहिल्याने प्रदर्शित झाले.  स्वत:च्या शक्तीवरचा विश्वास येथेच प्रथम आपणास दिसतो.''

बौध्दधर्माच्या उदयानंतर सांख्यशास्त्राला सर्वांगीण असे पध्दतशीर स्वरूप आले.  सांख्यशास्त्र म्हणजे मानवी मनोबुध्दीतून निघणारी केवळ आध्यात्मिक, तत्त्वज्ञानात्मक अशी विचारसरणी. बाह्यवस्तूंच्या निरीक्षणपरीक्षणाशी त्याचा तादृश संबंध नाही आणि बुध्दीच्या पलीकडे असणार्‍या प्रदेशांतील वस्तूंचे निरीक्षणपरीक्षण ह्या दर्शनाच्या आवाक्याबाहेरचे असल्यामुळे ह्या दर्शनात शक्य नव्हते.  बौध्दधर्माप्रमाणेच सांख्यशास्त्रही बुध्दिवादाच्या मार्गाने जात होते व जिज्ञासूवृत्तीने, कोणाचे अधिकारप्रामाण्य न मानता ते सत्यशोधन करण्याच्या बौध्दधर्माच्याच भूमिकेवरून त्याने त्याला सामना दिला.  बुध्दिप्राधान्यामुळे ईश्वराला दूर करणे प्राप्त होते, म्हणून सांख्यशास्त्रात निर्गुण वा सगुण परमेश्वर नाही, एकेश्वरवाद नाही, अद्वैतवादही नाही.  सांख्यशास्त्राची दृष्टी केवळ निरीश्वरवादी आहे, अतिपौरुषेय धर्माचा पायाच त्याने खणून टाकिला.  हे विश्व ईश्वराने निर्माण केले नाही.  पुरुष (किंवा अनेक पुरुष) व प्रकृती यांच्या क्रियाप्रतिक्रियांतून हे विश्व सारखे उत्क्रांत होत आहे.  ही प्रकृतीही केवळ जड नाही तर शक्तिमय आहे.  ही उत्क्रांती अखंड सुरू आहे.

सांख्य तत्त्वज्ञान द्वैती मानण्यात येते, कारण त्यात दोन मूलभूत तत्त्वे प्रकृती व पुरुष ही मानून त्यावर सिध्दान्त पध्दती उभारली आहे.  प्रकृती म्हणजे सदैव कर्मशील; विकारशील अशी शक्ती; आणि पुरुष म्हणजे अविकारी अव्यय असे तत्त्व.  हे पुरुष किंवा ते जीव चितस्वरूपी व अनंत आहेत.  पुरुष स्वत: काही करीत नसला तरी त्याच्या केवळ प्रभावाने त्याच्या केवळ सामर्थ्याने प्रकृती उत्क्रांत होत असते आणि ह्यामुळे ह्या विश्वाच्या घडामोडीचा पसारा सतत सुरू असतो.  कार्यकारणभावाचे तत्त्व अंगिकारण्यात आले आहे, परंतु काय हे कारणातच गुप्त असते असे मानण्यात येते.  कार्य आणि कारण म्हणजे एकाच वस्तूची प्रकट आणि अप्रकट रूपे.  व्यवहाराच्या भाषेत कारण आणि कार्य आपण निराळी स्वतंत्र मानतो; परंतु मूलत: ती एकच आहेत.

अशा रीतीने प्रतिपादन चालले असताना असा सिध्दान्त मांडला आहे की पुरुषाच्या म्हणजेच चितच्या साहचर्यामुळे कार्यकरणात्मक तत्त्वाने अव्यक्त प्रकृतीतून, त्या मूळच्या शक्तीतून नाना विविध मूलतत्त्वांचे अनेक प्रकारे संमिश्रण होऊन या व्यक्त सृष्टीचा व्याप वाढला आहे व त्यात सदैव स्थित्यंतर होत असते, व्याप चालतो.  या विश्वातील जे परमोच्च आहे आणि जे परम नीच आहे त्यांच्यामध्ये सातत्य आहे,  वस्तुत: ती एकच आहेत.  हे सारे प्रतिपादन आध्यात्मिक आहे. काही गृहीत सत्यांतर सारे खंडनमंडन चालते, व सारी चर्चा प्रदीर्घ, गुंतागुंतीची असली तरी बुध्दिवादाला धरून आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel