यामुळे उपनिषदांतील तत्त्वविवेचन व विचारसरणीचे पाणी कनिष्ठ वर्गापर्यंत झिरपत जाता जाता अखेर फार थोडे झाले व ते ओळखता येईना.  तत्त्वचिंतन करून नवेनवे निर्माण करणारा श्रेष्ठ अल्पसंख्य वर्ग व कनिष्ठ बहुजनसमाज यांच्यातले बुध्दिभेद अधिक स्पष्ट होऊ लागले.  याचा परिणाम कालांतराने वेगळे आंदोलन होऊन भौतिकवाद, अज्ञेयवाद, नास्तिकवाद, निरीश्वरवाद इत्यादी विचारांच्या प्रबळ लाटा उठल्या, यातूनच पुढे बौध्द व जैन धर्म उदयाला आहे.  पुन्हा एकवार एकीकरणाचा, समन्वयाचा, भिन्नभिन्न प्रतिस्पर्धी संप्रदाय आणि विचारसरणी यांच्यात सुसंवादित्व व मेळ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, त्याचे फळ म्हणजेच प्रसिध्द महाकाव्ये रामायण व महाभारत.  नवेनवे निर्माण करण्याची स्फूर्ती सामान्य जनतेत किंवा निदान श्रेष्ठ वर्गात स्पष्ट आढळते व या दोन वर्गांना एकजीव राखणारा काही एक प्रकारचा ओढा, परस्परांचे आकर्षण पुन्हा जिवंत झालेले आढळते.  एकंदरीत सर्व समाजाचा गाडा सर्व मिळून एक विचाराने ओढताना या काळात दिसतात.

नाट्य, वाङ्मय, शिल्पशास्त्र, संस्कृतिप्रसार, धर्मप्रचार, स्वदेशाच्या सीमेपार दूरवर केलेला धाडसी राज्यविस्तार या सर्व क्षेत्रांत विचार व प्रत्यक्ष कृती नवोनव प्रकारे निर्माण करण्याची स्फूर्ती पुरेपूर उसळून येऊन घडलेल्या प्रसंगांनी गच्च भरलेले कालखंड एकापुढे एक लागलेले दिसतात.  मधूनमधून संघर्षाचे, विसंवादीपणाचे कालखंड दिसतात ते परकीयांची आक्रमणे आणि काही अंतस्थ कारणे यामुळे घडले.  परंतु शेवटी या सर्वांवर मात करून एक नवीन संस्कृती निर्माण करणारी शक्ती पुन्हा प्रकट होऊन निर्माण शक्तीचा पुन्हा कालखंड येई, पुन्हा नवयुगनिर्मिती सुरू होई.  असा थोर काल नवनिर्मितीच्या बहराचा काल असा अखेरचा काळ इसवी सनाच्या चौथ्या शतकात सुरू झाला.  त्या कालखंडात सर्व बाजूंनी, सर्व क्षेत्रांत विकास होत राहिला होता.  ही जुनी कलात्मक प्रेरणा जरी कार्य करीत राहिली होती, सुंदर कलाकृती जरी निर्माण होत होत्या तरी दहाव्या शतकात किंवा अगोदरच र्‍हासाची कीड आतून लागलेली स्पष्ट दिसते.  ज्यांना अगदी भिन्नभिन्न पार्श्वभूमी होती असे निराळे वंश आहे आणि हिंदुस्थानच्या भ्रांत मनोबुध्दीसमोर त्यांनी एक नवीनच जोरदार शक्ती आणली; आणि या क्रियाप्रतिक्रियांतून नवीन प्रश्न उद्भवले व ते सोडवण्यासाठी नवीन उद्योग सुरू झाले.  इंडो-आर्यन संस्कृतीतून जे काही चांगले आणि काही वाईट ह्या दीर्घकालात निघाले ते आत्यंतिक व्यक्तिवादाचा परिणाम आहे असे वाटते.  या आत्यंतिक व्यक्तिवादामुळे, व्यक्तीच्या विकासावर विशेष भर दिला गेल्यामुळे असामान्य व्यक्ती, अलौकिक विभूती केवळ एकाच ऐतिहासिक कालखंडात नव्हे, तर प्रत्येक कालखंडात पुन:पुन्हा झालेल्या आढळतात.  जी संस्कृती टिकाव धरून राहिली, आजही टिकाव धरून आहे, जिला या व्यक्तिवादामुळे एक प्रकारची ध्येयात्मक व नैतिक पार्श्वभूमी आली.  ती पार्श्वभूमी जरी प्रत्यक्ष व्यवहारात तिचा फारसा परिणाम दिसत नसेल तरी आजही आहे. या पार्श्वभूमीच्या साहाय्याने व वरच्या वर्गांच्या प्रत्यक्ष उदाहरणाच्या प्रभावाच्या पुण्याईनेच समाज कसा तरी एकत्र राहिला आणि पुन:पुन्हा कोसळू पाहणारी सामाजिक रचनेची इमारत तग धरून उभी राहिली.  ह्या नमुनेदार उदाहरणामुळे वरच्या वर्गातच का होईना पण आश्चर्याने चकित व्हावे इतका बहर या संस्कृतीला व सुधारणेला आला आणि काही प्रमाणात हा बहर सर्वसामान्य जनतेतही नक्की आला.  त्यांची स्वत:ची श्रध्दा व आचार याहून भिन्न असलेली धार्मिक श्रध्दा व आचार याबद्दल त्यांनी परमसहिष्णुता बाळगली, आणि त्यामुळे समाजाला छिन्नभिन्न करणार्‍या संघर्षाला त्यांनी टाळून एक प्रकारे समाजात समतोलपणा राखला.  विशाल आर्यधर्माच्या विस्तृत चौकटीत राहून स्वत:च्या आवडीचे जीवन जगायला कितीतरी मोकळेपणा सर्वांना होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel