उत्तर आफ्रिका, विशेषत: स्पेन यांमध्ये ती त्यानंतर चालू राहिली.  शेकडो पंडित आपली ग्रंथसंपत्ती बरोबर घेऊन बगदादमधून पळाले, ते कैरो येथे आणि स्पेनमध्ये गेले व या दोन्ही ठिकाणी, विद्या, कलांना नवीन बहर आला.  परंतु अरबांच्या हातातून स्पेनही जाऊ पाहात होते.  इ.स. १२२६ मध्ये कार्डोबाचा पाडाव झाला.  परंतु ग्रॅनाडा येथील सत्ता आणखी दोन अडीचशे वर्षे टिकली व अरब संस्कृतीचे एक देदीप्यमान केंद्र म्हणून ग्रॅनाडा गाजला. अखेर इ.स. १४९२ मध्ये फर्डिनंड आणि इझाबेला यांनी ग्रॅनाडा जिंकून घेतला; आणि स्पेनमधील अरब सत्ता संपली.  त्यानंतर कैरो हे तुर्की अमलाखाली सुध्दा पुढे अरब संस्कृतीचे केंद्र म्हणून गाजत राहिले.  अगोदरच ऑटोमन तुर्कांनी इ.स. १४५३ मध्ये कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतले होते.  त्यामुळे मोकळ्या पडलेल्या काही शक्तिसामग्रीतून युरोपीय नवयुग पुढे सुरू झाले.

युरोप आशियात मोगलांनी जे विक्रम मिळविले, त्याला युध्दातील एक नवीन तंत्रही कारणीभूत होते.  युध्दाच्या तंत्रात एक नवीनच प्रकार आला.  लिडूडेल हार्ट म्हणतो, ''गुणात आणि प्रमाणात, चपळाईत आणि अचानकपणात, कुशलतेने रचना करण्यात; तसेच डावपेच लढवून अप्रत्यक्षपणे हल्ला करण्यात मोगलांच्या स्वार्‍यांना इतिहासात जोड नाही.''  जगात आजपावेतो झालेल्या लष्करी नेत्यांपैकी चेंगीझ सर्वांत मोठा नसला तरी अती मोठ्यांपैकी तो एक आहे यात संशय नाही.  आशिया व युरोपातील तलवारबहाद्दर- त्याच्या आणि त्याच्या नंतरच्या मोगलांसमोर केवळ काडीमात्र ठरले.  मध्य व पश्चिम युरोप त्याच्या तडाक्यातून वाचले ही केवळ दैवघटना होय.  या मोगलांपासून युरोपने युध्दातील नवीन डावपेचे घेतले.  नवीन युध्दाकला उचलली.  चीनमधील बंदुकीच्या दारूचा शोधही मोगलांमार्फत युरोपात गेला.

मोगल त्या वेळेस हिंदुस्थानात आले नाहीत.  ते सिंधू नदीशी आले आणि तेथून परतून; अन्यत्र दिग्विजय करीत गेले.  या मोगलांचे बलाढ्य साम्राज्य मोडल्यावर आशियाभर छोटीछोटी राज्ये निर्माण झाली.  इ.स. १३६९ मध्ये स्वत:ला चेंगीझच्या कुळातील म्हणविणारा तैमूर तुर्क पुढे आला.  आईकडून तो चेंगीझच्या कुळातील होता, परंतु त्याचा बाप तुर्क होता.  चेंगीझच्या विजयाची, पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याचा त्याने प्रयत्न केला.  समरकंद ही त्याची राजधानी, थोडा काळ का होईना, साम्राज्याचे मुख्य स्थान बनली.  तैमूरच्या मरणानंतरचे गादीवरचे राजे शांतताप्रिय होते.  लष्करी पराक्रमांपेक्षा त्यांना विद्या व कलांची अभिरुची होती.  मध्य आशियात तैमूरी नवयुग उदयाला आहे, आणि या वातावरणात पुढे बाबर जन्मला.  बाबर तैमूरच्याच वंशातला होता. हिंदुस्थानात त्याने मोगल सत्तेचा पाया घातला व इ.स. १५२६ मध्ये त्याने दिल्ली घेतली.  वैभवशाली मोगलांतील तो पहिला होय.

चेंगीझखान मुसलमान नव्हता.  खान म्हटले की आपणांस मुसलमान असावा असे वाटते; कारण त्याचे नाव आता इस्लामशी संबध्द आहे.  परंतु चेंगीझ हा आकाशधर्माचा, शामाईधर्माचा उपासक होता.  याचा स्पष्ट अर्थ काय ते मलाही माहीत नाही.  परंतु शामाई या शब्दावरून बौध्दधर्मी लोकांना अरबी भाषेत जो शब्द आहे तो अचूक मनात येतो.  अरब लोक बौध्दधर्मीयास 'समनी' म्हणत.  हा शब्द संस्कृत 'श्रमण' म्हणजे भिक्षू यांपासून बनलेला होता.  बौध्दधर्माची भ्रष्ट, विकृत रूपे आशियाच्या नाना भागांत त्या वेळेस होती त्यात मंगोलियाही अपवाद नव्हता.  चेंगीझ अशा स्वरूपाच्या कोणत्या तरी धार्मिक वातावरणात वाढला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel