जसे हिंदी पंडित चीनमध्ये जात तसे चिनी पंडितही इकडे येत, अशी दुहेरी जा-ये होती.  ज्यांनी आपले यात्रावृत्तांत लिहिले आहेत आणि जे सुप्रसिध्द आहेत, अशा तिघांची नावे अनुक्रमे फाहिआन, ह्युएनत्संग आणि इत्सिंग अशी आहेत.  फाहियान पाचव्या शतकात हिंदुस्थानात आला.  तो चीमध्ये कुमारजीवाचा शिष्य झाला होता.  फा-हिआन चीन सोडून हिंदुस्थानात येण्यासाठी निघताना कुमारजीवांना प्रणाम करण्यासाठी गेला असताना आचार्यांने शिष्यास जे सांगितले त्याची मनोरंजक हकीकत फाहिआनने दिली आहे.  कुमारजीव फाहिआनला म्हणाले, ''भारतात तू आपला सारा वेळ धार्मिक ज्ञान मिळविण्यातच दवडू नकोस; तेथील लोकांच्या चालीरीती, त्यांचे जीवन यांचाही नीट अभ्यास कर; असे केल्यानेच भारतीय आणि त्यांचा देश याची तुम्हां चिनी लोकांना अधिक यथार्थ कल्पना येईल; त्यांना तुम्ही नीट समजू शकाल.''  फाहिआन हिंदुस्थानात येऊन पाटलीपुत्र येथील विद्यापीठात त्याने अध्ययन केले.

परंतु चिनी प्रवाशांतील सर्वांत प्रसिध्द असा जो ह्युएनत्संग तो सातव्या शतकात हिंदुस्थानात आला.  त्या वेळेस चीमध्ये प्रसिध्द टँग घराणे राज्य करीत होते; आणि उत्तर हिंदुस्थानात हर्षवर्धन हा सम्राटा होता.  ह्युएनत्संग खुष्कीच्या मार्गाने आला.  गोबीचे मैदान-वाळवंट ओलांडून तुर्फान आणि कुच, ताश्कंद आणि समरकंद, बल्क, खोतान आणि यारकंद अशी ठिकाणी घेतघेत पुढे हिमालय ओलांडून तो हिंदुस्थानात आला.  त्याने आपल्या प्रवासवर्णनात वाटेतील धोके, संकटे, नाना साहसे, तसेच मध्य आशियातील नाना बौध्दधर्मी राजे, ठिकठिकाणचे बौध्दमठ आणि बौध्दधर्माचे उत्कट अनुयायी तुर्क, सारे काही दिले आहे.  हिंदुस्थानातही तो सर्वत्र हिंडला, फिरला.  सर्वत्र त्याचे सन्मानपूर्वक, गौरवपूर्वक स्वागत करण्यात आले.  आपल्या प्रवासात अचूक निरीक्षण करून नाना लोकांची, नाना स्थळांची बरोबर माहिती त्याने गोळा केली; प्रवासात ज्या गमतीच्या किंवा विचित्र कथा तो ऐके त्यांचीही त्याने नोंद करून ठेवली आहे.  पाटलिपुत्रापासून जवळच असलेल्या नालंदा विद्यापीठात त्याने काही वर्षे वास्तव्य केले.  त्या वेळेस हे विद्यापीठ विविध विषयांत अभ्यासासाठी प्रसिध्द होते, आणि दूरदूरचे विद्यार्थी तेथे येत. जवळजवळ दहा हजार विद्यार्थी व भिक्षू तेथे राहात होते असे म्हटले आहे.  ह्युएनत्संगने स्मृतिपारंगताची पदवी घेतली व तेथील विद्यापीठाचा तो उपकुलगुरू झाला.

ह्युएनत्संगने जे प्रवासवर्णन लिहिले आहे त्याचे नाव 'सि-यू-कि' म्हणजे 'पश्चिमेकडील राज्याची हकीकत'—म्हणजे हिंदुस्थानची, असे आहे व ते मोठे मनोवेधक आहे.  त्या वेळच्या चीन देशासारख्या संस्कृती व शिष्टाचार यांत पुढारलेल्या देशाची राजधानी सि-आन-फू ही विद्वत्ता व कला यांचे मोठे केंद्र समजली जात होती.  अशा या राजधानीत रुळलेल्या या चाणाक्ष पंडिताने भारतातील त्या वेळच्या परिस्थितीचे दिलेले वर्णन व त्यावर केलेली टीका महत्त्वाची आहे.  शिक्षणाच्या पध्दतीचे त्याचे वर्णन केले आहे.  शिक्षण लहानपणीच सुरू होई.  हळूहळू विद्यापीठात विद्यार्थी प्रदेश करीत.  तेथे पाच शाखांचे शिक्षण मिळे : व्याकरण, कलाकौशल्य, शास्त्र, आयुर्वेद, तर्क आणि तत्त्वज्ञान.  भारतीयांची विद्याभिरुची पाहून त्याला विशेष आश्चर्य वाटले.  थोडेसे प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक झालेले होते, कारण भिक्षू आणि धर्मोपदेशक शिक्षकाचे काम करीत.  तो म्हणतो, ''सामान्य जनता साहजिकच चंचल वृत्तीची असली तरी हे लोक नेकीने वागणारे व मनाने थारे आहेत.  पैशांच्याबाबत त्यांच्याजवळ कसली लबाडी नाही, व न्याय करतील तो अगदी विचार करून.  त्यांच्या वागणुकीत फसवेपणा नाही, कपट नाही; दिलेले वचन पाळतील, शपथेप्रमाणे वागतील.  राज्यकारभाराच्या नियमांत कडक सचोटी आहे, परंतु प्रत्यक्ष वागणूक मधुर आणि सौम्य आहे.  बंडखोर गुन्हेगार फारसे नाहीतच, मधूनमधून त्यांचा थोडाफार उपद्रव होतो.  राज्यकारभार उदार तत्त्वांवर आधारलेला असल्यामुळे, त्याची अंमलबजावणी साधी आहे.  लोकांना वेठीला धरले जात नाही.  त्यामुळे लोकांवरील करही माफक आहेत.  व्यापारात गढलेले व्यापारी आपल्या कामकाजासाठी सारखे जात-येत असतात.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel