हिंदी सैन्यातही पारडे झुकते ठेवून तोल संभाळण्याचे हे धोरण हेतुपुरस्सर खूपच प्रमाणात चालविण्यात आले.  सैन्यातील वेगवेगळ्या तुकड्यांची अशी योजना केली होती की, त्यांना आपण एका राष्ट्राचे आहोत अशी संयुक्त राष्ट्रीय भावना त्यांच्यात लेशमात्रही येऊ नये.  एक राष्ट्रीय वृत्ती ऐवजी जातीय व प्रांतिक निष्ठेला व तसल्याच भावनांच्या जयजयकाराला उत्तेजन दिले जाई.  जनतेपासून सैन्याला अलग राखण्याचे शक्य ते सारे प्रयत्न करण्यात आले, साधी वर्तमानपत्रेही हिंदी पलटणीपर्यंत पोचू देत नसत.  लष्करातील महत्त्वाच्या सार्‍या मुख्य जागा इंग्रजांच्या हाती असत.  हिंदी मनुष्याला 'किंग्ज कमिशन' म्हणजे खुद्द राजाकडून अधिकाराचा हुद्दा कधी मिळत नसे.  भरपूर अनुभव घेतलेला, पोक्त परंतु व्हाइसरायकडून हुद्दा मिळालेला किंवा नुसता साधा हिंदी अंमलदार असला तरी एखादा नवशिका गोरा अंमलदार सहज त्याच्यापेक्षा वरिष्ठ समजला जाई.  सैन्याच्या मुख्य कचेरीत हिंदी माणसाला हिशोबी खात्यातील किरकोळ कारकुनापलीकडची वरची जागा कधी मिळत नसे.  त्यातही आणखी खबरदारी अशी घेतली जाई की, शस्त्रांपैकी मार्‍याने वरचढ शस्त्रे हिंदी फौजेला न देता ती हिंदुस्थानात ठेवलेल्या खास ब्रिटिश फौजेकरता राखून ठेवली जात.  देशात दंगाधोपा झाला तर ताबडतोब शांत करण्यासाठी, तसेच लोकांना जरब असावी म्हणून हिंदुस्थानातील सर्व मोक्याच्या ठिकाणी हिंदी पलटणीबरोबर गोर्‍या पलटणी 'अंतर्गत निर्भयता सैन्य' असे नाव देऊन ठेवलेल्या असत.  देश ताब्यात ठेवण्यासाठीच हे अंतर्गत सैन्य खरोखर असे व त्यात ब्रिटिश लोकही भरपूर असत.  या सैन्याशिवाय दुसरे मैदानी सैन्य होते, त्यात हिंदी पलटणींचाच विशेष भरणा असे व हिंदुस्थानबाहेरच्या कामगिरीसाठी हे सैन्य असे.  विशिष्ट वर्गातूनच सैन्यात भरती करण्यात येत असे, त्यांना लढाऊ जाती म्हणत, व त्यात उत्तर हिंदुस्थानातील लोकांचीच विशेष भरती होई.

या प्रकारातसुध्दा पुन्हा एकवार हिंदुस्थानात ब्रिटिश सत्तेला मुळापासून कायम जडलेली विसंगती आपल्याला आढळते.  ब्रिटिश राज्याने या देशात राजकीय ऐक्य निर्माण केले व त्यामुळे राष्ट्रभर चैतन्याचे वारे मोकळे वाहू लागले.  त्यामुळे आपण एक आहोत ही भाषा तर रुळलीच, पण शिवाय स्वातंत्र्य मिळविण्याचे ध्येयही डोळ्यांसमोर आले.  परंतु ज्या ब्रिटिशांमुळे ही राजकीय ऐक्यभावना आली तेच ब्रिटिश सरकार मराठी ऐक्यभावना मोडून काढण्याच्या खटपटीला लागले.  राजकीय दृष्ट्या एकी होऊ द्यावयाची नाही याचा अर्थ त्या वेळेस तरी देशाचे तुकडे पाडणे अशा प्रकारचा नव्हता, तेव्हा सरकारला साधावयाचे हेते ते इतकेच की, देशातील राष्ट्रीय वृत्ती दुबळी व्हावी म्हणजे सबंध देशावर ब्रिटिश राज्य चालविता येईल.  परंतु कसेही पाहिले तरी, संस्थानांना कधी नव्हते ते महत्त्व देऊन, प्रतिगामी वृत्तीच्या लोकांना फूस देऊन व त्यांच्यावर विसंबून, तसेच लोकांत कलागती लावून, भांडायला एकाविरुध्द दुसर्‍याला उठवून, धर्माचे वेड, किंवा प्रांताचा दुरभिमान यामुळे बेकी वाढत राहावी अशी मुद्दाम योजना करून व क्रांती झाली तर आपण बुडून जाऊ अशी धास्ती बाळगणार्‍या देशद्रोही लोकांचे गट काढून सरकारने देशात एकी होऊ नये अशी खटपट चालविली हे नक्की.  परकी साम्राज्यशाही हे सारे करणारच, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.  हिंदी राष्ट्रीय दृष्ट्या जरी हे सारे अहितकारक असले तरी परकी सरकारपासून दुसरी काही अपेक्षा करणे व त्याप्रमाणे घडले नाही म्हणून आश्चर्य करणे म्हणजे भोळसटपणा होय.  परंतु पुढील घटना व गुंतागुंती नीट समजण्यासाठी आरंभापासूनच सरकारचे हे असे धोरण होते ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी.  'हिंदी राष्ट्रीय जीवनातील महत्त्वाचे घटक, महत्त्वाचे भाग' म्हणून सरकार ज्यांची आजकाल आपणांस वारंवार बजावून आठवण करून देत असते ते या धोरणातूनच जन्माला आले आहेत.  इंग्रजांनीच हे 'महत्त्वाचे राष्ट्रीय घटक' निर्माण केले, त्यांना भांडायला, फूट पाडायला फूस दिली, आणि 'आपणांस काय ते एकमताने ठरवा' असे त्यांनाच आता सांगण्यात येत आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel