जे घटनामय जग सभावती आपण पाहतो ते त्या सत्याचे नुसते प्रतिबिंब आहे.  त्या सत्याची नुसत्या प्रयोगाच्या अवस्थेतल्या पातळीवर व्यवहारात दिसणारी छाया म्हणजे हे जग.  यालाच माया म्हणतात. मायेचे भ्रांती, भ्रमण असे भाषांतर करतात.  परंतु ही चूक आहे.  माया केवळ अभावरूप नाही. असणे (सत्) आणि नसणे (असत्) यांच्या मधील स्थिती म्हणजे माया. माया म्हणजे एक प्रकारे अस्तित्व आहे म्हणून आजकालच्या सापेक्षतावादाची कल्पना केली म्हणजे ती मायेच्या अर्थाच्या जवळची आहे.  तर मग या जगात चांगले काय, वाईट कोणते ? का या चांगले-वाईट या कल्पनांत काही अर्थ नाही,  ह्या नुसती प्रतिबिंबे, छाया आहेत ?  अंतिम पृथक्करणात या सदसतांचे काहीही होवो.  परंतु आपल्या या रोजच्या व्यवहारात, या नैतिक भेदांना सत्यता आहे, महत्त्व आहे.  व्यक्ती जेथे व्यक्ती म्हणून वावरत आहेत तेथे भले काय, बुरे काय, चांगले काय, वाईट काय, या प्रश्नांना महत्त्व आहे.

या सान्त व सोपाधिक व्यक्तिगत जीवांना त्या अनंतालाही मर्यादित केल्याशिवाय त्याची कल्पना येत नाही.  त्या अनंताचे सोपाधिक व मर्यादित स्वरूपातच हे जीवन दर्शन घेऊ शकतात.  परंतु या समर्याद व सोपाधिक कल्पना व रूपे शेवटी त्या परब्रह्मात, त्या अनंतातच विराम पावतात.  म्हणून धर्माचे रूप हीही एक सापेक्ष वस्तू ठरते.  त्या त्या व्यक्तीने आपल्या पात्रतेनुसार त्या अनंताची कल्पना करावी व आपल्या शक्त्यनुसार त्याचे स्वरूप निर्मावे.

ब्राह्मणधर्मातील चातुरर्वर्ण्याची सामाजिक संघटना शंकराचार्यांनी आपल्या मानववंशाच्या सामुदायिक अनुभवाचे व शहाणपणाचे हे द्योतक आहे अशा अर्थाने मान्य केली.  परंतु मनुष्य कोणत्याही वर्णाचा असो, परमोच्च ज्ञान तो मिळवू शकतो अशी त्यांनी घोषणा केली.

शंकराचार्यांची वृत्ती, त्यांचे तत्त्वज्ञान याच्यातून जग असत्य आहे.  आचार्यांनी प्रत्येक व्यक्तीकरता ध्येय मानलेले जे आत्मस्वातंत्र्य ते शोधून मिळविण्याकरता संसाराच्या सामान्य खटपटीतून निवृत्त होणेच योग्य आहे असा ध्वनी निघतो.  आचार्यांच्या शिकवणीत अनासक्ती व त्याग यांच्यावरही सारखा भर दिलेला आहे.

परंतु स्वत: शकराचार्य म्हणजे आश्चर्यकारक उत्साह व प्रचंड कार्य यांचा मूर्तिमन्त अवतार होता.  जीवनाच्या कुरुक्षेत्रापासून पळून जाऊन बिळात बसून, तपोवनात एका कोपर्‍यात बसून, दुसर्‍यांचे काही का होईना, मला माझा मोक्ष मिळवू दे असे म्हणणारे ते नव्हते.  मलबारात म्हणजे हिंदुस्थानच्या अगदी दक्षिणेला, अगदी एका टोकाला जन्म झालेला असताना असंख्य लोकांना भेटून, त्यांच्याशी चर्चा करीत, वाद घालीत, युक्तिवादाने खंडनमंडन करीत, अखेर त्या सर्वांना नि:शंक करून आपल्या उत्कट आवेशाचा व प्रचंड स्फूर्तीचा अंशत: प्रसाद देऊन त्यांच्यात नवचैतन्य ओतीत, शंकराचार्यांनी सार्‍या हिंदू-स्थानभर सारख्या फेर्‍या घालून सबंध देश पालथा घातला.  निश्चित आपले असे काही दैवी कार्य आपल्याला करावयाचे आहे याची त्या महाभागाला स्पष्ट जाणीव होती.  कन्याकुमारीपासून तो हिमालयापर्यंतचा सारा देश त्यांची कर्मक्षेत्र मानले. हा देश वरवर निराळा दिसला, त्याचे नाना बाह्य आविष्कार दिसले, तरी सांस्कृतिक दृष्ट्या हा महान देश एक आहे, त्याच्यात सर्वत्र एकच आत्मा धगधगतो आहे असे त्यांना वाटत होते.  तत्कालीन भारतात नाना मतमतांतरे माजून, भारताची बुध्दी विकल झाली होती.  शंकराचार्यांनी या सर्वांचा समन्वय करून या मतामतांतून अखेर एकच सर्वव्यापी मत स्थापण्याची पराकाष्ठा केली.  त्या केवळ बत्तीस वर्षांच्या आयुष्यात अनेक दीर्घ जन्मांचे कार्य त्यांनी केले व भारतावर स्वत:च्या प्रभावी बुध्दिमत्त्वाचा व विकसित व्यक्तिमत्त्वाचा असा ठसा त्यांनी ठेवला आहे की, आजही तो दिसून येतो.  ते तत्त्वज्ञानी होते, गाढे पंडित होते, अज्ञेयवादी होते, गूढवादी होते; कवी होते, संत होते आणि हे सारे काही असून प्रत्यक्ष सुधारक आणि समर्थ असे संघटकही होते.  असा काही गुणांचा अपूर्व संगम त्यांच्या विभूतीत आढळतो.  ब्राह्मणधर्मांतर्गत त्यांनी दहा धार्मिक संप्रदाय स्थापिले.  त्यातील चार अद्याप चांगलेच जिवंत आहेत.  हिंदुस्थानच्या चार दिशांच्या चार कोपर्‍यांत त्यांनी चार मठ स्थापिले.  एक म्हैसूर संस्थानात शृंगेरी येथे आहे, दुसरा पूर्व किनार्‍यावर पुरी येथे आहे; तिसरा पश्चिम किनार्‍यावर काठेवाडातील द्वारकेत आहे; आणि चौथा हिमालयाच्या अंतरंगात बद्रीनाथ येथे आहे.  मलबारकडच्या या ब्राह्मणाने वयाच्या बत्तिसाव्या वर्षी हिमालयाच्या हिमाच्छादित उत्तुंग केदारनाथ या ठिकाणी देह ठेवला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel