ब्रिटिश मंत्रिमंडळाची योजना नुसत्या काँग्रेसने नव्हे तर प्रत्येक पक्षाने, प्रत्येक गटाने धुडकावली होती.  हिंदुस्थानातल्या मवाळांतल्या मवाळ अशा राजकारणी नेत्यांनी सुध्दा त्या आपल्याला पसंत नाहीत असे स्पष्ट जाहीर केले होते.  मुस्लिम लीगखेरीज करून बाकी सर्व पक्षांनी ती योजना अमान्य करताना दिलेली कारणे ही बहुतेक सारी तीच एकमेकाशी जुळती होती.  मुस्लिम लीगच्या नेहमीच्या ठरवी पध्दतीप्रमाणे कोण काय म्हणते त्याची वाट पाहून नंतर इतर पक्षांनी आपली मते प्रसिध्द केल्यावर स्वत:ची म्हणून काही कारणे देऊन त्या योजनेला नकार दिला.

ब्रिटिश पार्लमेंटात व अन्यत्रही असे एक विधान केले गेले होते की, ही योजना काँग्रेसने धुडकावली, त्याचे कारण म्हणजे गांधीजींची काही एक तडजोड न करण्याची हटवादी वृत्ती.  हे विधान सर्वस्वी खोटे आहे.  या योजनेमुळे पुढे जो अनिश्चित व अगणित वाटण्या करीत बसण्याचा गोंधळ उडणार होता तो काढून देण्याची व हिंदी संस्थानांच्या एकूण नऊ कोट प्रजेला त्यांच्या स्वत:च्या भवितव्याबद्दल चकार शब्द काढू न देण्याची जी त्या प्रजेची विल्हेवाद लावण्यात आली होती ती, गांधीजींना अगदी नापसंत होती.  तशी इतर अनेकांना, बहुतेक सार्‍यांनाच नापसंत होती.  मुळातली योजना सोडून नंतर ज्या काही वाटाघाटी झाल्या त्या चालू काळात तूर्त ताबडतोब राज्ययंत्रात काय फरक करता येण्याजोगा आहे याबद्दलच्या होत्या, त्यांचा त्या भविष्यकालीन योजनेशी तसा संबंध नव्हता.  ह्या वाटाघाटी चालल्या त्या गांधीजींना त्यांच्या पत्नीच्या दुखण्यामुळे तेथून जावे लागले त्यानंतर त्यांच्या गैरहजेरीत चालल्या होत्या व त्यांनी त्या वाटाघाटींत कोणत्याही प्रकारे भाग घेतला नव्हता.  पूर्वी अनेक प्रसंगी अहिंसेच्या तत्त्वावरून काँग्रेसच्या कार्यकारी समितीचा गांधीजींशी मतभेद झाला होताच व आता तर त्या समितीला या युध्दात भाग घेण्याकरिता व विशेषत: देशाच्या संरक्षणाकरिता राष्ट्रीय वृत्तीचे सरकार स्थापण्याची ओढ लागलेली होती.

सगळ्या लोकांच्या विचारावर या युध्दाची छाया पसरली होती, त्याच प्रश्नाने त्यांची मने व्यापलेली होती,  हिंदुस्थानवर स्वारी होण्याचा प्रसंग येऊन ठेपला होता.  पण खरोखर पाहिले तर ब्रिटिश सरकारचे व आमचे एकमत व्हायला युध्द आडवे येत नव्हते, कारण युध्द म्हटले की ते त्यातले तज्ज्ञच चालवणार होते, इतरांचे ते काम नव्हे.  तेव्हा, युध्द कसे चालवावे याबद्दल, ब्रिटिश सरकारचे व आमचे जमणे सोपे होते.  खरा बांधा होता तो राष्ट्रीय सरकार स्थापून त्याच्या हाती राज्यकारभारावरची सत्ता सोपविण्याचा.  हा वांधा जुनाच होता, तो हिंदी राष्ट्रीय पक्ष विरुध्द ब्रिटिश साम्राज्यवादी यांचे दरम्यान कधी काळापासूनच चालत आलेला होता, आणि हिंदुस्थानचे राज्य धरून ठेवणारा हिंदुस्थानातला व इंग्लंडातला गोर्‍या राज्यकर्त्यांचा वर्ग, युध्द येवो की इतर काही होवो, हातात आहे त्याला कवटाळून बसण्याचा आग्रह धरून बसला होता, आणि त्याच्या पाठीशी उभी होती मिस्टर विन्स्टन चर्चिल यांची भव्य मूर्ती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel