संकटांनी भरलेल्या समुद्रमार्गाने जाऊन अशा वसाहती वसविण्यासाठी लोक का प्रवृत्त झाले ?  त्यांना कोणती प्रेरणा, अंत:स्फूर्ती होती ?  या वसाहतींची कल्पना येण्यापूर्वी नाना व्यक्ती किंवा काही व्यापारी संघ पुष्कळ वर्षांपासून या बाजूला व्यापारी करीत असले पाहिजेत हे निर्विवाद.  अतिप्राचीन संस्कृत ग्रंथांतून पूर्वेकडील या देशासंबंधी मोघम उल्लेख आहेत.  त्यांनी दिलेल्या नावांशी आजची कोणती जोडायची याची अडचण पडते, परंतु काही नावे अगदी उघड आहेत.  उदाहरणार्थ, जावा म्हणजे यवद्वीप; यवाच्या धान्याचा देश.  आजही हिंदुस्थानात यव म्हणजे जव किंवा ज्वारी-बाजरी असा अर्थ आहे.  प्राचीन ग्रंथांतील दुसरी नावे अशाच प्रकारे खनिज पदार्थाशी, धातूंशी किंवा एखाद्या धान्याशी किंवा उद्योगाशी जोडलेली अशी आहेत.  या नावावरूनच व्यापाराची कल्पना एकदम पुढे येते.

डॉ. आर. सी. मजुमदार यांनी म्हटले आहे, ''बहुजनसमाजाचे मन ओळखायला वाङ्मय हे जर साधारण बिनचूक साधन असेल तर ख्रिस्त शकाच्या आधी आणि नंतर काही शतके व्यापारी आणि उद्योगधंदा यांचेच भारतीयांना अपार वेड होते असे म्हणावे लागेल.''  भारतीय अर्थव्यवस्था वाढत होती आणि दूरच्या बाजारपेठांसाठी सारखा शोध सुरू होता हाच याचा अर्थ.

ख्रिस्त शकापूर्वीच्या तिसर्‍या आणि दुसर्‍या शतकांत हा व्यापार हळूहळू वाढत गेला.  या साहसी व्यापार्‍यांच्या पाठोपाठ धर्मप्रसारकही गेले असावेत.  कारण अशोकानंतरचाच हा काळ आहे.  संस्कृतमधील जुन्या गोष्टींतून धाडसी समुद्रगमनाच्या, गलबते फुटण्याच्या, वादळांच्या अनेक हकीकती आहेत.  ग्रीक आणि अरब यानीं लिहून ठेवलेल्या वृत्तान्तावरूनही पहिल्या ख्रिस्ती शतकात हिंदुस्थान आणि अतिपूर्वेकडील प्रदेश यांच्यात व्यवस्थित दळणवळण होते हे दिसून येते.  चीन, हिंदुस्थान, इराण, अरबस्थान आणि भूमध्यसमुद्र हा जो लांब व्यापारमार्ग, त्याच्यावरच मलाया, इंडोनेशिया हे भाग नेमके आहेत.  हे भौगोलिक महत्त्वाचे असून शिवाय हे प्रदेश मौल्यवान धातू, खनिज पदार्थ, मसाले, इमारती लाकूड इत्यादींनी समृध्द होते.  मलाया आजच्याप्रमाणे त्या काळीही कथिलाकरता प्रसिध्द होता.  बहुधा सर्वात अगोदरचे पहिले पहिले समुद्रावरचे प्रवास हिंदुस्थानच्या पूर्वकिनार्‍यावरून कलिंग (म्हणजे ओरिसा), वंग, ब्रह्मदेश असे जाऊन नंतर खाली मलायाकडे वळून होत असावेत.  नंतर पूर्व आणि दक्षिण हिंदुस्थानातून थेटचे मार्ग नीट आखले गेले असावेत.  याच समुद्रमार्गाने पुष्कळसे चिनी यात्रेकरू हिंदुस्थानात आले.  पाचव्या शतकात आलेला फा-हिआन जावा येथे थांबला होता.  येथे पुष्कळ पाखंडी आहेत-म्हणजे बौध्दधर्म न पाळता ब्राह्मणधर्म पाळणारे आहेत अशी आपल्या वृत्तांतात त्याची तक्रार आहे.

प्राचीन हिंदुस्थानात गलबते बांधण्याचा धंदा फारच पुढारलेला व भरभराटीस आलेला होता असे स्पष्ट दिसते.  त्या काळात बांधल्या जाणार्‍या गलबतांची काही सविस्तर माहिती आपणास मिळाली आहे.  त्या काळातील कितीतरी हिंदी बंदरांचे उल्लेख आहेत.  आंध्र प्रांतात सापडलेल्या दुसर्‍या तिसर्‍या शतकातील काही नाण्यांवर दोन डोलकाठ्यांच्या गलबताचे चित्र आहे, अजिंठा येथील चित्रांमध्ये सीलोन जिंकून घेण्याचा प्रसंग दाखविलेला आहे.  त्यात हत्ती घेऊन जाणारी गलबते दाखविली आहेत.  मूळच्या हिंदी वसाहतींतून जी मोठमोठी राज्ये, साम्राज्ये पुढे वाढली, ती आरमारी शक्तीवर आधारलेली होती.  व्यापार हा त्यांचा प्राण होता आणि त्यासाठी समुद्रमार्गाचे स्वामित्वही अपरिहार्य होते.  समुद्रावर एकमेकांच्या आरमारी लढायाही अधूनमधून होत.  एकदा दक्षिण हिंदुस्थानातील चोल राजांशी यांची आरमारी लढाई जुंपली.  चोलराज्यसुध्दा आरमारात प्रबळ होते.  त्यांनी आरमारी स्वारी पाठवून काही काळ तरी शैलेन्द्राच्या साम्राज्याला गप्प बसविले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel